CIBIL Score होईल खूपच कमी! हॅकर्सकडून केला जातोय मोठा घोटाळा, Credit Card Scam पासून व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:38 IST2024-12-16T13:27:12+5:302024-12-16T13:38:02+5:30

Credit card scam : क्रेडिट कार्डद्वारे फसवणुकीचे नवे प्रकरण समोर आले आहे.

नवी दिल्ली : बँका आपल्या क्रेडिट कार्डचा भरपूर प्रचार करतात. कारण क्रेडिट कार्डद्वारे बँकाची चांगलीच कमाई होत असते. कार्ड विकण्यासाठी बँका अनेकदा बाहेरील एजन्सींना कामावर ठेवतात आणि त्यांना विकल्या गेलेल्या प्रत्येक कार्डसाठी निश्चित रक्कम देतात. मात्र, आता क्रेडिट कार्डद्वारे फसवणुकीचे नवे प्रकरण समोर आले आहे. क्रेडिट कार्ड घोटाळ्याबद्दल सविस्तर जाणून घ्या…

भारतात कोणतेही कठोर डेटा गोपनीयता कायदे नसल्यामुळे, या एजन्सी तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, पॅन नंबर आणि फोन नंबर वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळा करतात. मग, ते तुम्हाला कॉल करतात आणि नवीन क्रेडिट कार्डवर खूप जास्त लिमिट देऊन आमिष दाखवतात. परंतु जेव्हा तुम्ही सर्व कामे पूर्ण करता, तेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात खूपच कमी लिमिट मिळते.

उदाहरणार्थ, एका व्यक्तीला कॉल आला. कॉल करण्याऱ्या व्यक्तीकडे संबंधित व्यक्तीचे नाव, फोन नंबर आणि पॅन नंबर होते आणि त्याने एक लाख रुपये क्रेडिट लिमिट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सर्व काम पूर्ण केल्यावर त्या व्यक्तीला फक्त ५० हजार रुपयांचे लिमिट असलेले कार्ड मिळाले.

अनेक बँका आणि एजन्सी अशा क्रेडिट कार्डची विक्री करत आहेत, त्यामुळे सावधगिरी बाळगली पाहिजे. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता, तेव्हा ते एक प्रकारचे कर्ज असते. तुम्ही जास्त खर्च केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो.

उदाहरणार्थ, जर तुमचे लिमिट २० हजार रुपये असेल आणि तुम्ही १५ हजार रुपये खर्च करत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. दरम्यान, या एजन्सींना नवीन कार्ड विकून पैसे मिळतात, म्हणून ते लोकांना जास्त लिमिट देऊन फसवतात. पण, जेव्हा लोक कार्ड घेतात तेव्हा त्यांना खूप कमी मर्यादा मिळतात, ज्यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोर खराब होतो.

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी थेट बँकेकडून नवीन क्रेडिट कार्ड घेणे चांगले. बँक तुम्हाला योग्य माहिती देईल. अशा कोणत्याही एजन्सीने तुमची फसवणूक केली असेल, तर क्रेडिट कार्ड अॅक्टिव्ह करू नका, जेणेकरून तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होणार नाही.