Credit Card Tips: सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्डनं खरेदी करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 09:51 AM2024-09-10T09:51:44+5:302024-09-10T10:02:12+5:30

Credit Card Tips : या सणांच्या काळात तुम्ही क्रेडिट कार्डच्या मदतीने शॉपिंग करत असाल तर थोडी काळजी घेतली पाहिजे.

भारतात सणासुदीला सुरुवात झाली आहे. आता देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानंतर काही दिवसांत दसरा, दिवाळी, नवरात्री असे अनेक सण साजरे होणार आहेत. सणासुदीच्या काळात लोक भरपूर खरेदी करतात.

खरेदी करण्यासाठी अनेकजण क्रेडिट कार्ड वापरतात. या सणांच्या काळात तुम्ही क्रेडिट कार्डच्या मदतीने शॉपिंग करत असाल तर थोडी काळजी घेतली पाहिजे. तसं पाहायचं झालं तर क्रेडिट कार्डच अनेक फायदे आहेत. मात्र, याच क्रेडिट कार्डचा वापर योग्य पद्धतीनं न केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं.

याच पार्श्वभूमीवर क्रेडिट कार्डचा कसा वापर करायला हवा? कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? त्याबद्दल जाणून घ्या... सणासुदीच्या काळात अनेकजण कोणताही विचार न करता क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शॉपिंग करतात. मात्र क्रेडिट कार्डच्या मदतीने प्रमाणापेक्षा जास्त शॉपिंग करू नये.

सणांसाठी शॉपिंग करत असाल तर अगोदर तुमचे बजेट ठरवले पाहिजे. त्यानंतरच शॉपिंग केली पाहिजे. प्रत्येक क्रेडिट कार्डची लिमिट ठरवून दिलेली असते. मात्र सणासुदीच्या काळात अनेकजण क्रेडिट कार्डच्या लिमिटच्या ७० ते ८० टक्के रुपये खर्च करतात. असं केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो.

क्रेडिट कार्डचा वापर लिमिटच्या ३० टक्केच राहील, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक महिन्याला क्रेडिट कार्डचं बिल येते. प्रत्येक महिन्याच्या बिल डेटला लक्षात घेऊनच तुम्ही शॉपिंग केली पाहिजे. हा विचार न केल्यास तुम्हाला क्रेडिट कार्डचं बिल देताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सणासुदीच्या काळात जास्तीत जास्त रिवॉर्ड्स मिळावेत म्हणून अनेकजण क्रेडिट कार्डच्या मदतीनं शॉपिंग करतात. मात्र, रिवॉर्ड्ससाठी असं करु नये, तसं केल्यास तुमच्यावरील कर्जात वाढ होऊ शकते. नेहमी गरजेच्या वस्तूंचीच शॉपिंग करावी.