क्रेडिट कार्डपासून ते आधारपर्यंत... ३ दिवसांनी बदलतील 'हे' ५ नियम!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 10:14 AM2024-08-28T10:14:08+5:302024-08-28T10:49:47+5:30

येत्या सप्टेंबर महिन्यात अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.

नवी दिल्ली : दर महिन्याच्या सुरुवातीला देशात काही नियम जाहीर केले जातात. ऑगस्टमध्येही एलपीजी गॅसच्या किमतींपासून ते क्रेडिट कार्डच्या व्यवहारापर्यंतच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले होते. आता ऑगस्ट महिना संपायला अवघे ३ दिवस उरले आहेत. त्यानंतर सप्टेंबर महिना सुरू होईल.

येत्या सप्टेंबर महिन्यात अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. पुढील महिन्यात क्रेडिट कार्डपासून सिलिंडर आणि आधारपर्यंतच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. जाणून घेऊया सप्टेंबरमध्ये कोणते मोठे बदल होणार आहेत आणि त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर कसा परिणाम होऊ शकतो?

सप्टेंबरपासून हवाई इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (एटीएफ) आणि सीएनजी-पीएनजीच्या किंमती तेल बाजारातील कंपन्या सुधारित करतील. यानंतर दर बदलू शकतात. एटीएफ आणि सीएनजी-पीएनजीच्या नवीन किमती १ सप्टेंबरपासून लागू केल्या जाऊ शकतात.

नवीन क्रेडिट कार्ड नियम सप्टेंबरमध्ये लागू होतील, ज्यामध्ये HDFC बँकेद्वारे युटिलिटी व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा सेट करणे आणि IDFC फर्स्ट बँकेद्वारे पेमेंट शेड्यूल बदलणे, याचां समावेश आहे. हे अपडेट कार्डधारकांच्या रिवॉर्ड मिळवण्याच्या आणि त्यांच्या वापरण्याच्या पद्धतीवर परिणाम करू शकतात.

फ्रॉड कॉल्स आणि मेसेजच्या विरोधात नवीन नियम १ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. TRAI मार्गदर्शक तत्त्वे ३० सप्टेंबरपर्यंत टेलीमार्केटरला ब्लॉकचेन-बेस्ड सिस्टममध्ये बदलतील, ज्याचा उद्देश सुरक्षा वाढवणे आणि स्पॅम कॉल्स कमी करणे आहे.

आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर आहे. शुल्क टाळण्यासाठी युजर्सना या अंतिम मुदतीपर्यंत त्यांचा पत्ता किंवा इतर माहिती अपडेट करावी लागेल.

सप्टेंबरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ३ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता दिला जात होता, मात्र वाढीनंतर तो ५३ टक्के केला जाऊ शकतो.