भारताचे 'रिटेल किंग' म्हणून ओळख, अब्जाधीश गुंतवणूकदार; वडिलांचं साम्राज्य पुढे नेताहेत ३ कन्या By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 09:22 AM 2024-11-09T09:22:39+5:30 2024-11-09T09:35:06+5:30
या तिन्ही बहिणींनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. वडिलांच्या व्यवसायाची सूत्रं त्यांनी ठामपणे हाती घेतली आहेत. Success Story : डी-मार्ट (DMart) आणि त्याचे मालक राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. राधाकिशन दमानी हे प्रसिद्ध उद्योजक तर आहेतच पण ते एक ज्येष्ठ गुंतवणूकदारही आहेत. त्यांच्या मुली मधू चांडक, मंजरी चांडक आणि ज्योती काब्रा या केवळ अब्जावधी डॉलर्सच्या रिटेल साम्राज्याच्या केवळ उत्तराधिकारीच नाहीत तर, डी-मार्टच्या भविष्यासाठी सक्रिय भूमिकाही बजावत आहेत.
या तिन्ही बहिणींनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. वडिलांच्या व्यवसायाची सूत्रं त्यांनी ठामपणे हाती घेतली आहेत. मधू फायनान्शिअल स्ट्रॅटेजीमध्ये पारंगत आहेत, तर मंजरी दैनंदिन कामकाज आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त आहे. त्याचवेळी ज्योती यांचा फोकस मर्जंडायजिंग आणि कन्झुमर कनेक्शनवर आहे. या तिन्ही बहिणींनी २०१५ मध्ये बॉम्बे स्वदेशी स्टोअर्समधील ५० टक्के हिस्सा ४२ कोटी रुपयांना विकत घेऊन आपलं व्यावसायिक कौशल्य दाखवून दिलं.
राधाकिशन दमानी यांना 'रिटेल किंग ऑफ इंडिया' म्हटलं जातं. डी-मार्टच्या माध्यमातून त्यांनी रिटेल क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. २३ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती असलेले दमानी हे केवळ यशस्वी उद्योजकच नाहीत तर दिग्गज गुंतवणूकदारही आहेत. त्यांनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सची स्थापना केली आणि डी-मार्टच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणारी उत्पादनांसाठी एक पर्याय दिला.
मात्र, दमानी यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता त्यांच्या मुलींच्या खांद्यावर आली आहे. मधु चांडक ही त्यांची मोठी मुलगी. त्यांनी कार्डिफ विद्यापीठातून फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. मधू या बॉम्बे स्वदेशी स्टोअर्सच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय डी-मार्टच्या सीएसआरवरही त्या देखरेख ठेवतात.
मंजरी चांडक या एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचे संचालक आहेत. कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित अनेक कंपन्यांमध्ये त्या सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्यांना मर्चेंडाइजिंग आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये प्रचंड रस आहे. डी-मार्टच्या यशासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मंजरी ग्राहककेंद्रित व्यवसायात आपली पकड मजबूत करत आहेत.
तिसरी मुलगी ज्योती काबरा या डी-मार्टच्या दैनंदिन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांचा भर मर्चेंडाइजिंग आणि कन्झ्युमर एंगेजमेंटवर असतो. रिटेल चेनच्या वाढीसाठी हे आवश्यक आहे. वडिलांकडून रिटेल उद्योगातील बारकावे शिकून ज्योती भविष्यात कंपनीची धुरा सांभाळण्यासाठी स्वत:ला तयार करत आहेत.
२०१५ मध्ये या तिन्ही बहिणींनी बॉम्बे स्वदेशी स्टोअर्समधील ५० टक्के हिस्सा ४२ कोटी रुपयांना विकत घेतला होता. लोकमान्य टिळक आणि जेआरडी टाटा यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी आणि उद्योगपतींनी १९०५ मध्ये हे स्टोअर सुरू केलं होतं. हे भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतीक आहे.
या गुंतवणुकीच्या माध्यमातून या बहिणींनी केवळ आपल्या रिटेल व्यवसायच विस्तारला नाही, तर भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा भाग जपला आहे. ११५ वर्षे जुन्या या ब्रँडला मॉडर्न लूक देऊन त्यांना परंपरा आणि समकालीन रिटेल प्रॅक्टिस यांची सांगड घालायची आहे. भविष्याविषयी त्यांचं दृष्टी यातून दिसून येते.