रेल्वेच्या या निर्णयामुळे तिकिटावर अतिरिक्त शुल्क लागणार, रेल्वे प्रवास महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 09:31 AM2020-09-19T09:31:24+5:302020-09-19T09:39:58+5:30

भारतीय रेल्वेने येत्या काही दिवसांमध्ये देशातील वर्दळ असलेल्या रेल्वे स्टेशनांवर युझर चार्ज आकारण्याची घोषणा केली आहे.

सध्या कोरोनाच्या फैलावामुळे देशातील रेल्वे सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेली नाही. मात्र कोरोनाकाळ संपल्यानंतर रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

भारतीय रेल्वेने येत्या काही दिवसांमध्ये देशातील वर्दळ असलेल्या रेल्वे स्टेशनांवर युझर चार्ज आकारण्याची घोषणा केली आहे. या युझरचार्जमुळे रेल्वेची तिकिेटे महाग होणार असून, रेल्वेप्रवास महागणार आहे.

भारतीय रेल्वेचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी सांगितले की, ज्या रेल्वे स्टेशनवर अधिक वर्दळ असते, अशा ठिकाणी किरकोळ युझर चार्ज आकारण्यात येईल. अशा ठिकाणी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार देशातील १० ते १५ टक्के स्थानकांवर युझर चार्ज लागण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत भारतीय रेल्वेजवळ सुमारे सात हजार रेल्वेस्टेशन आहेत. त्यामुळे देशातील सुमारे एक हजार रेल्वे स्टेशन या बदललेल्या नियमांच्या चौकटीत येतील.

युझर चार्ज हा सोईसुविधांच्या बदल्यात लावण्यात येणार आहे. सध्या तरी हा युझर चार्ज विमानतळावर लावण्यात येतो. विमानतळावर लावण्यात येणारा हा युझर चार्ज विमान तिकीटामध्ये जोडण्यात येतो.

याचा अर्थ असा होतो की विमान तिकिटाची जी किंमत तुम्ही देता त्यामध्ये युझर चार्जचा समावेश असतो. आता त्याला रेल्वे स्टेशनांवर लावण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे रे्ल्वे तिकिटांची किंमत वाढणार आहे.