लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 08:23 AM 2020-05-23T08:23:55+5:30 2020-05-23T08:34:12+5:30
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांमध्ये कामगार कपात, पगार कपात केली जात आहे. मात्र याच काळात ई-कॉमर्स कंपन्याकडून होणारी ऑनालाईन खरेदी वाढली आहे. कोरोना विषाणूचा वाढता फैलाव आणि लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी झाली आहे. आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने अनेक उद्योगधंद्यांना जबर फटका बसला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये कामगार कपात, पगार कपात केली जात आहे. मात्र याच काळात ई-कॉमर्स कंपन्याकडून होणारी ऑनालाईन खरेदी वाढली आहे.
त्यामुळे वाढलेल्या ऑनलाईन मागणीचा पुरवठा करण्यासाठी अॅमेझॉन इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन इंडिया ग्राहकांकडून होणाऱ्या वाढत्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी ५० हजार हंगामी कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
या नोकऱ्या वेअरहाऊसिंग आणि डिलिव्हरी नेटवर्कमधील असतील, असे अॅमेझॉन इंडियाने आपल्या पत्रकात म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या फैलावामुळे विविध वस्तूंच्या ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढले आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी ५० हजार कर्मचाऱ्यांची हंगामी स्वरूपात भरती करण्यात येईल.
देशभरात रेड झोन वगळता अन्य भागांमध्ये लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सवतली देण्यात आल्याने ई कॉमर्सचे व्यवहार आता पूर्वपदावर येत आहेत. दरम्यान, स्वीगी, झोमॅटो, ओला यासारख्या कंपन्यांनी कामगारांमध्ये कपात केल्याने अॅमेझॉनमध्ये होत असलेली भरती विशेष मानली जात आहे.
अॅमेझॉन आणि ई-कॉमर्स आपले लहान ग्राहक, छोटे व्यवसाय आणि देशासाठी किती महत्त्वपूर्ण भूमिका बजाऊ शकतात. हे आम्ही कोरोनाच्या या फैलावादरम्यान शिकलो आहोत, असे अॅमेझॉनचे ग्राहक समाधान परिचालन उपाध्यक्ष अखिल सक्सेना यांनी सांगितले.
आम्ही देशातील ग्राहकांना त्यांच्या गरजेची प्रत्येक वस्तू मिळण्यासाठी मदत करू इच्छित आहोत. त्यासाठी आम्ही साठवण आणि डिलिव्हरी नेटवर्कमध्ये सुमारे ५० हजार रोजगाराच्या संधी निर्माण करू इच्छित आहोत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अॅमेझॉनमध्ये हंगामी स्वरूपात काम करण्यास इच्छूक असणाऱ्यांनी १८००-२०८-९९०० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा Seasonalharingindia @ amazon.com या ईमेलवर माहिती पाठवावी, असे आवाहन कंपनीने केले आहे.