युजवेंद्र चहलकडून धनश्री वर्माला मिळणार ₹४.७५ कोटी, पाहा कोणते आहेत जगातील सर्वात महागडे घटस्फोट?
By जयदीप दाभोळकर | Updated: March 20, 2025 08:59 IST2025-03-20T08:43:59+5:302025-03-20T08:59:41+5:30
टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि मॉडेल अभिनेत्री धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांना आता पूर्णविराम लागल्याचं दिसतंय. पण तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात महागडे घटस्फोट कोणते आहेत?

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि मॉडेल अभिनेत्री धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांना आता पूर्णविराम लागल्याचं दिसतंय. ५ फेब्रुवारीला चहल-धनश्री यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु याबाबत कुठलीही अधिकृत पुष्टी दिली गेली नव्हती. परंतु आता मात्र या घटनेबाबत नवी माहिती समोर आली आहे.
युजवेंद्र चहल यानं घटस्फोटाच्या अर्जाच्या वेळीच ४ कोटी ७५ लाखांची पोटगी देण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं होतं. या मुद्द्यावर न्यायालयानं होकार दर्शवला आणि दोन्ही बाजूंच्या सामंजस्यानं घटस्फोटाची प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश कौटुंबिक न्यायालयाला दिले. मिळालेल्या माहितीनुसार, ४.७५ कोटींच्या एकूण पोटगीपैकी २.३७ कोटींची पोटगी आधीच धनश्रीला ट्रान्सफर करून झाली असल्याचं सांगण्यात येतंय. तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात महागडे घटस्फोट कोणते आहेत?
बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी २७ वर्षांच्या संसारानंतर ३ मे २०२१ रोजी घटस्फोटाची घोषणा केली. या दाम्पत्याची अनेक शहरांमध्ये मालमत्ता होती. या घटस्फोटातून मेलिंडा यांना ७३ अब्ज डॉलर्स मिळाल्याचं मानलं जात आहे. हा जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा घटस्फोट आहे. फोर्ब्सच्या रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर मेलिंडा गेट्स यांना विविध कंपन्यांमध्ये किमान ६.३ अब्ज डॉलरचे शेअर्स मिळाले होते.
जेफ बेजोस-मॅकेन्झी स्कॉट
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी स्टॉक यांचा २०१९ मध्ये घटस्फोट झाला. या घटस्फोटाची बातमी चर्चेत होती. बेजोस यांना आपल्या पत्नीला ३८ अब्ज डॉलर्स द्यावे लागले. हा जगातील दुसरा सर्वात महागडा घटस्फोट आहे. स्कॉट आता ३६.४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ४५ व्या स्थानावर आहे. बेजोस २१४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
अॅलेक-जोसलिन विल्डनस्टीन
फ्रेंच-अमेरिकन उद्योगपती आणि आर्ट डीलर अॅलेक विल्डनस्टीन यांनी लग्नाच्या २१ वर्षांनंतर १९९९ मध्ये पत्नीला घटस्फोट देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी त्यांना पत्नी जोसलिन विल्डनस्टीन यांना ३.८ अब्ज डॉलरची मोठी पोटगी द्यावी लागली. हा इतिहासातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट मानला जातो.
रुपर्ट मर्डोक-अॅना मारिया टॉर्व
रुपर्ट मर्डोक आणि पत्रकार अॅना मारिया टॉर्व यांनी विवाहाच्या ३१ वर्षांनंतर १९९८ मध्ये विभक्त झाल्याची घोषणा केली. त्यासाठी टॉर्व्हला १.७ अब्ज डॉलर्स मिळाल्याचं मानलं जात आहे. घटस्फोटानंतर अवघ्या १७ दिवसांनी मर्डोक यांनी वेंदी डेंग यांच्याशी विवाह केला, तर टॉर्व्ह यांनीही काही दिवसांनी विल्यम मॅनला जीवनसाथी बनवलं.
स्टीव-एलियन विन
अमेरिकेतील लास वेगासचे कॅसिनो किंग स्टीव्ह आणि एलियन विन यांनी एकमेकांशी दोन वेळा लग्न केलं. त्यांचं पहिलं लग्न १९६३ ते १९८६ पर्यंत टिकलं. तर दुसरं लग्न १९९१ ते २०१० पर्यंत टिकलं. दुसऱ्यांदा घटस्फोट झाला तेव्हा एलियन विन यांना सुमारे एक अब्ज डॉलरची पोटगी मिळाल्याचं म्हटलं जातं. हा जगातील पाचवा सर्वात महागडा घटस्फोट आहे.