पोस्ट पेमेंटसह डिजिटल सेवा महागणार, नव्या वर्षात खिशावर होणार थेट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 08:29 AM2021-12-28T08:29:05+5:302021-12-28T08:40:44+5:30

Digital payment services : क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या सुरक्षेत आणखी पारदर्शकता आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या सेवांच्या नियमांत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

मुंबई : नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वचजण आतुर असले तरी जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून डिजिटल सेवांचे काही नियम बदलणार आहेत. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. ते नियम कोणते, त्याचा दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो, याचा आढावा...

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, १ जानेवारीपासून खात्यातून रोख रक्कम काढणे किंवा जमा करण्यावरील शुल्कात बदल करण्यात आला आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने निर्धारित केलेल्या मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.

गूगलच्या विविध सेवा याआधी मोफत मिळत होत्या. १ जानेवारीपासून त्यावर शुल्क आकारणी केली जाणार आहे. गूगल ॲप, यू-ट्यूब, गुगल प्ले स्टोअर आणि अन्य सेवांसाठी आता पैसे भरावे लागतील. तसेच रुपे, अमेरिकन एक्सप्रेस किंवा डिनर कार्डचा वापर केल्यास यापुढे गूगलकडून त्याच्या तपशिलाची माहिती संग्राह्य केली जाणार नाही. त्यामुळे पेमेंट करताना प्रत्येकवेळी कार्डचे तपशील मॅन्युअली प्रविष्ट करावे लागतील.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या गॅस सिलिंडरचा भाव निश्चित करतात. गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतल्यास या दरांत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नव्या वर्षात घरगुती गॅस किती रुपयांनी वाढतो, याची चिंता सर्वसामान्यांना आहे.

क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या सुरक्षेत आणखी पारदर्शकता आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या सेवांच्या नियमांत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ते १ जानेवारीपासून लागू होतील. ऑनलाइन आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी वेबसाईट आणि पेमेंट गेटवेद्वारे संग्रहित केलेला ग्राहकांचा डाटा हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याऐवजी एन्क्रिप्टेड टोकनचा वापर करण्यास सांगितले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, ग्राहकांना निश्चित मर्यादेनंतर एटीएम वापरासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. देशातील सर्व बँकांनी १ जानेवारीपासून एटीएम चार्जेस ५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ठरावीक मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढल्यानंतर दरवेळी २१ रुपये मोजावे लागतील. याशिवाय ग्राहकांना जीएसटीही द्यावा लागेल. सध्या ही रक्कम २० रुपये आहे, पुढील महिन्यापासून ती २१ रुपये करण्यात आली आहे.