₹१८ साठी धुतली भांडी, आज आहेत १०० पेक्षा अधिक रेस्तराँ; भेटा अब्जाधीश 'डोसा किंग'ना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 08:43 AM2023-11-09T08:43:52+5:302023-11-09T09:10:15+5:30

जर मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळतं.

जर मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळतं. जर यशस्वी व्हायचं हे मनात ठरवलं आणि कठोर मेहनत घेतली तर कोणतीही व्यक्ती असो ती यशाची पायरी नक्कीच चढते. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा पगार एकेकाळी १८ रुपये होता आणि आज ते ३०० कोटींचा व्यवसाय चालवत आहेत. आम्ही तुम्हाला सांगत आहोत सागर रत्ना रेस्तराँचे मालक जराम बानन यांच्याबद्दल. पाहूया कसा होता त्यांचा प्रवास.

कर्नाटकातील उडुपी येथे जन्मलेले जयराम बनान यांनी जेव्हा घर सोडलं तेव्हा त्यांचं वय सुमारे १३ वर्षांचे असेल. वडिलांकडून मार पडण्याची भीती हे त्यांचं घर सोडण्याचं कारम होतं.

बानन यांना वडिलांची खूप भीती वाटत होती. शाळेत असताना ते एका वर्गात नापास झाले होते. त्यावेळी वडील आपल्याला मारतील अशी भीती त्यांना वाटत होतं. याच भीतीनं त्यांनी १३ व्या वर्षी घर सोडलं.

घर सोडून बानन थेट मुंबईला आले. हा १९६७ चा काळ होता. येथे त्यांचा एक ओळखीचा माणूस होता जो रेस्टॉरंट चालवत होता. बनान या रेस्टॉरंटमध्ये काम करू लागले. लहान असल्यानं त्यांना कसली फारशी माहिती नव्हती. अशा परिस्थितीत ते भांडी धुत असत.

या कामासाठी त्यांना दरमहा १८ रुपये पगार मिळत होता. त्यांनी ६ वर्षे भांडी धुण्याचं काम केलं. यानंतर बानन यांचं काम पाहता त्यांना आधी वेटर आणि नंतर रेस्टॉरंटचा मॅनेजर बनवण्यात आलं. त्यामुळे त्यांचा पगार दरमहा २०० रुपये झाला.

बानन यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केलं. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. त्यांना दिल्लीत स्वतःचं रेस्तराँ उघडायचं होतं. बनान त्यानंतर दिल्लीत आले. या ठिकाणी येण्यापूर्वी ते गाझियाबादमधील सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे ​​कॅन्टीन चालवत असत. यानंतर त्यांनी दक्षिण दिल्लीतील डिफेन्स कॉलनीमध्ये पहिलं रेस्तराँ उघडलं. त्याचं नाव सागर ठेवले. या रेस्टॉरंटमधून त्यांनी पहिल्याच दिवशी ४०८ रुपयांची कमाई केली.

बानन यांनी अथक मेहनत केली. गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिलं. जेव्हा आधीचा व्यवसाय चांगला चालला त्यानंतर ४ वर्षांनी त्यांनी दिल्लीत दुसरं रेस्तराँ उघडलं. या रेस्तराँचं नाव सागर रत्न होतं. जयराम बनन यांना डोसा किंग म्हणूनही ओळखलं जातं. कालांतराने सागर रत्न हा मोठा ब्रँड बनला.

आज सागर रत्नचे केवळ भारतातच नव्हे तर सिंगापूर, कॅनडा आणि बँकॉकमध्ये आउटलेट आहेत. आज बानन ३०० कोटींहून अधिकचा व्यवसाय चालवतात. जगभरात त्यांची जवळपास १०० रेस्तराँ आहेत.