शेअर बाजारात गुंतवणूक करता? ३१ तारखेपर्यंत करा ‘हे’ महत्त्वाचं काम, अन्यथा खातं गोठवलं जाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 03:13 PM2023-03-17T15:13:36+5:302023-03-17T15:23:03+5:30

महत्त्वाचं काम केलं नाहीत, तर शेअर्सची खरेदी विक्रीही करता येणार नाही.

जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल, शेअर्सचं ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ३१ मार्चपर्यंत तुम्हाला हे महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागेल. ते न केल्यास तुमचं खातं फ्रीझ होईल आणि तुम्ही शेअर्सची खरेदी विक्रीही करू शकणार नाही.

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) सर्व डिमॅट खाती आणि ट्रेडिंग खातेधारकांसाठी नॉमिनी असणं अनिवार्य केलं आहे. नॉमिनीसाठी नाव जोडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ आहे. तुमच्या डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यात नॉमिनीचं नाव नसल्यास, ते त्वरित जोडून घ्या.

तुम्ही नॉमिनी जोडलं नाही तर तुमचं खातं (Demat Accounts) गोठवलं जाईल. यानंतर तुम्ही शेअर बाजारात शेअर्सची खरेदी-विक्री करू शकणार नाही. प्रथम नॉमिनी जोडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ होती.

नॉमिनी जोडण्यासाठी, प्रथम तुमच्या डीमॅट खात्यात लॉग इन करा. आता पेजवरील My nominees वर जा. येथे तुम्ही 'अॅड नॉमिनी' किंवा 'ऑप्ट-आउट' पर्याय निवडू शकता. आता नॉमिनीचे तपशील दाखल करा आणि नॉमिनीचं आयडी प्रुफ अपलोड करा.

पुढे, पर्सेंटेजमध्ये नॉमिनीचा हिस्सा प्रविष्ट करा. आता दस्तऐवजावर ई-स्वाक्षरी करा. ही प्रक्रिया आधार OTP द्वारे पूर्ण करावी लागेल. यानंतर दस्तऐवज पडताळणी होईल आणि २४-४८ तासांत प्रक्रिया पूर्ण होईल.

तुमच्या डिमॅट खात्यात नॉमिनी जोडण्यासाठी, तुम्ही नॉमिनेशन फॉर्म भरू शकता. यासाठी तुम्ही त्यावर स्वाक्षरी करून कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या पत्त्यावर कुरिअर करू शकता.

नॉमिनी तुमच्या ट्रेडिंग आणि डीमॅट खात्यावर लागू होईल. तथापि, नॉमिनी तुमच्या डिमॅट खात्यात जोडला जाईल. ज्या गुंतवणूकदारांनी नॉमिनीचे तपशील आधीच दिले आहेत त्यांना ही माहिती देण्याची गरज नाही.

ज्या गुंतवणूकदारांनी नवीन ट्रेडिंग आणि डीमॅट खाती तयार केली आहेत त्यांना डिक्लेरेशन फॉर्मद्वारे नॉमिनी द्यावी लागेल. डिक्लेरेशन फॉर्मवर खातेदाराची स्वाक्षरी असेल.

मात्र, नॉमिनी दाखल करताना साक्षीदाराची गरज नाही. ई-साइन सेवेचा वापर करूनही नॉमिनी दाखल करता येते. म्हणजेच, तुम्ही ऑनलाइन नॉमिनी दाखल करू शकता.