तुमच्या Pan Card एक्सपायरी डेट असते का? भल्याभल्यांना याचं उत्तर ठाऊक नाही By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 09:59 AM 2024-10-15T09:59:37+5:30 2024-10-15T10:11:55+5:30
Pan Card Expiry Date : पॅन कार्ड हे आजच्या काळात अतिशय महत्त्वाचं दस्तऐवज आहे. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी याची गरज भारते एनएसडीएलद्वारे पॅन कार्ड जारी केलं जातं. पण याला एक्सपायरी असते का? जाणून घेऊया. Pan Card Expiry Date : पॅन कार्ड हे आजच्या काळात अतिशय महत्त्वाचं दस्तऐवज आहे. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी याची गरज भारते एनएसडीएलद्वारे (National Securities Depository Limited) पॅन कार्ड जारी केलं जातं. यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख आणि १० अंकांचा अल्फान्यूमेरिक नंबर नोंदवला जातो.
बँक खातं उघडण्यापासून आयटीआर भरण्यापर्यंत पॅनकार्डची खूप गरज असते. करचुकवेगिरी रोखण्याच्या दृष्टीनेही हे अतिशय उपयुक्त मानलं जातं. आजच्या काळात बहुतांश लोकांकडे पॅन कार्ड असते, पण तुमच्या पॅन कार्डची वैधता किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? पॅन कार्डची एक्सपायरी डेट असते का? याचं उत्तर अनेकांना माहीत नसतं. याबद्दलच आज जाणून घेऊ.
पॅन कार्डला कोणतीही एक्सपायरी डेट नसते, म्हणजेच एकदा पॅन कार्ड बनवलं असेल तर त्याची वैधता आयुष्यभर राहते. त्यामुळे पॅनकार्ड बनवल्यानंतर त्याची एक्सपायरी होईल याची चिंता करण्याची गरज नाही. होय, जर तुमचं पॅन कार्ड हरवलं किंवा खराब झालं तर तुम्ही ते पुन्हा बनवून घेऊ शकता. एनएसडीएल तुम्हाला डुप्लिकेट पॅन कार्ड बनवण्याची सुविधा देखील देतं.
आयकर विभागाच्या नियमानुसार एका व्यक्तीकडे एकच पॅनकार्ड असणं आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त पॅनकार्ड ठेवणं बेकायदेशीर आहे. त्यावर कारवाई होऊ शकते. आयकर कायदा १९६१ च्या कलम २७२ ब मधील तरतुदींनुसार एकापेक्षा जास्त पॅनकार्ड बाळगल्यास १० हजार रुपये दंड किंवा किमान ६ महिने तुरुंगवास किंवा शिक्षा आणि दंड दोन्ही होऊ शकतात. जर तुमच्याकडे चुकून दोन पॅनकार्ड असतील तर ही चूक वेळीच सुधारा आणि एक पॅन कार्ड सरेंडर करा.
तुम्ही पॅन कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे सरेंडर करू शकता. ऑनलाइन सरेंडर करण्यासाठी तुम्हाला एनएसडीएलच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर Application Type ड्रॉप-डाऊनमधून, Changes or Correction in existing PAN Data/Reprint of PAN Card (No changes in existing PAN Data) हा पर्याय निवडा.
फॉर्म भरून सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट रजिस्टर केली जाईल. यानंतर ईमेल आयडीवर एक टोकन नंबर पाठवला जाईल. टोकन नंबर नोट करा आणि खाली दिलेल्या Continue with PAN Application Form वर क्लिक करून प्रोसेस सुरू ठेवा. आता एक नवीन वेबपेज ओपन होईल. या ठिकाणी Submit scanned images through e-Sign चा पर्याय निवडा.
पेजच्या खालच्या डाव्या बाजूला तुम्हाला जे पॅन कार्ड ठेवायचं आहे त्याचा तपशील भरावा लागेल. विचारण्यात आलेली माहिती भरा, त्यानंतर नेक्स्टचा पर्याय निवडा. त्यानंतर मागितलेली कागदपत्रं जसे फोटो, स्वाक्षरी, पत्ता, ओळखपत्र आदी अपलोड करा. आवश्यक ठिकाणी पैसे भरा. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी पावती दिसेल. ती डाऊनलोड करा आणि सुरक्षित ठेवा.
आता पावतीच्या कॉपीसह दोन फोटो एनएसडीएल कार्यालयात पाठवा. पावती पाठवण्यापूर्वी लिफाफ्याला Application for PAN cancellation आणि पावती क्रमांकासह लेबल करा. तसंच डुप्लिकेट पॅनची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याला पत्र पाठवून ती रद्द करण्याची विनंती करा.