Domino's Pizza: 'डोमिनोज'चं ठरलं! आता 'स्विगी', 'झोमॅटो'वरुन डिलिव्हरी बंद?, समोर आलं मोठं कारण.. By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 08:22 PM 2022-07-22T20:22:24+5:30 2022-07-22T20:34:28+5:30
Domino's Pizza: स्मार्टफोनचा वाढता वापर आणि आकर्षक डिस्काऊंटमुळे भारतात फूड डिलिव्हरी अॅप्सची चलती आहे. पण 'डोमिनोज' या अग्रगण्य पिझ्झा कंपनीनं आता मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. 'डोमिनोज' पिझ्झा इंडिया फ्रेंचायझीनं आता फूड डिलिव्हरीसाठी अॅपमधून 'झोमॅटो' आणि 'स्विगी'मधून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांनंतर तुम्ही 'झोमॅटो' किंवा 'स्विगी' वरुन 'डोमिनोज'चा पिझ्झा ऑर्डर करू शकणार नाही.
झोमॅटो आणि स्विगी भारतातील लोकप्रिय फूड डिलिव्हरी अॅप्स आहेत. मग इतक्या मोठ्या फ्रँचायझीसोबतचा करार रद्द करण्याचा विचार डोमिनोज का करतंय? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर कमिशन हे यागचं कारण असल्याचं बोललं जात आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार झोमॅटो आणि स्विगीनं आता आपल्या फूड कमीशनमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे डोमिनोज पिझ्झा इंडिया कंपनी नाराज झाली आहे. त्यामुळे या दोन्ही अॅप्समधून आपले प्रोडक्ट काढून टाकण्याचा विचार कंपनी करत आहे.
झोमॅटो आणि स्विगीवर गंभीर आरोप जुबिलेंट फूडवर्क्स JUBI.NS कंपनी भारतात डोमिनोज आणि डंकिन डोनट्सची फूड साखळी ऑपरेट करण्याचं काम करते. जुबिलेंट कंपनी भारतातील सर्वात मोठी फूड सर्व्हीस कंपनी आहे. कंपनीचे देशात १६०० हून अधिक ब्रँड्सचे रेस्टॉरंट्स आऊटलेट्स आहेत. यात १५६७ डोमिनोज तर २८ डंकिन आऊटलेट्सचा समावेश आहे.
जुबिलेंट कंपनीनं केलेल्या खुलाशानुसार CCI नं झोमॅटो आणि स्विगीच्या चौकशीचे आदेश दिले होते. दोन्ही अॅप्सबाबत कथित गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्या होत्या. दोन्ही कंपन्यांवर रेस्टॉरंट्स पार्टनर्ससोबत अवैध पद्धतीनं व्यापार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
जुबिलेंट घेणार मोठा निर्णय जुबिलेंटनं दिलेल्या माहितीनुसार भारतातील एकूण व्यापारापैकी त्यांचा २६-२७ टक्के व्यापार केवळ ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आला आहे. यात त्यांच्या स्वत:च्या मोबाइल अॅप्लिकेशन आणि वेबसाइटचाही समावेश आहे. कंपनीनं १९ जुलै रोजी CCI ला लिहिलेल्या पत्रात कमीशन वाढवल्याप्रकरणी जुबिलेंट कंपनी आपले प्रोडक्ट्सची आपल्याच ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर ट्रान्सफर करण्याचा विचार करत असल्याचं नमूद केलं आहे.
कमीशनमुळे रेस्टॉरंट उद्योजक प्रचंड नाराज स्मार्टफोनचा वाढता वापर आणि आकर्षक डिस्काऊंटमुळे भारतात फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या व्यवसायानं प्रचंड वेग पकडला. यात स्विगी आणि झोमॅटोनं मजबूत पकड निर्माण केली आहे. आता त्यांच्यावरच २० ते ३० टक्क्यांच्या कमीशनची मर्यादा ओलांडण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्विगी आणि झोमॅटोकडून घेतलं जाणारं इतक्या मोठ्या प्रमाणातलं कमीशन हे व्यवहारिकदृष्ट्या योग्य नाही असं रेस्टॉरंट उद्योजकांचं म्हणणं आहे. वाढत्या कमिशनमुळे डोमिनोजसह इतर अनेक रेस्टॉरंट कंपन्या चिंतेत आहेत.
कमीशनमध्ये वाढ केली तर यातून रेस्टॉरंट मालक आणि उद्योजकांचा नफा कमी होईल असं एका रेस्टॉरंट उद्योजक एक्झिक्युटिव्हनं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.