Adani Group Pranav Adani : हार्वर्ड आणि बोस्टनमधून शिक्षण, गौतम अदानींशी रक्ताचं नातं; समूहाच्या विस्तारात मोठा वाटा, कोण आहे ही व्यक्ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 09:03 AM2024-09-26T09:03:33+5:302024-09-26T09:12:34+5:30

Gautam Adani News : दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली अदानी समूह वेगानं प्रगती करत आहे. अदानी एन्टरप्रायझेस ही समूहाची प्रमुख कंपनी आहे. पण अदानी समूहाच्या विस्तारात मोलाचा वाटा असलेली व्यक्ती कोण हे आज आपण जाणून घेऊ.

Gautam Adani News : दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली अदानी समूह वेगानं प्रगती करत आहे. अदानी एन्टरप्रायझेस ही समूहाची प्रमुख कंपनी आहे. प्रणव अदानी हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. अदानी समूहाच्या विस्तारात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

प्रणव यांचे गौतम अदानी यांच्याशी रक्ताचं नातं आहे. संपत्ती आणि प्रसिद्धीमुळे चर्चेत असणारे गौतम अदानी हे प्रणव अदानी यांचे काका आहेत. अर्थात प्रणव अदानी हे आपल्या काकां इतके प्रसिद्ध नाहीत. परंतु, समूहात त्यांचा अतिशय मोठा प्रभाव आहे.

प्रणव हे विनोद अदानी यांचे सुपुत्र आहेत. विनोद अदानी हे गौतम अदानी यांचे मोठे बंधू आहेत. प्रणव यांनी बोस्टन विद्यापीठातून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये बीएससीचं शिक्षण घेतलंय. यानंतर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंट प्रोग्रामही पूर्ण केलाय.

प्रणव अदानी यांनी १९९९ मध्ये अदानी विल्मर लिमिटेडमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अदानी समूह आणि विल्मर इंटरनॅशनल ग्रुप यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अदानी विल्मरनं २०२२ मध्ये आपला आयपीओ लाँच केला.

प्रणव यांनी कृषी क्षेत्रात समूहाच्या विस्ताराचं नेतृत्व केलं. अदानी अॅग्री लॉजिस्टिक्स आणि अदानी अॅग्री फ्रेश लाँच करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. फॉर्च्युन ब्रँडनं भारताच्या खाद्यतेलाच्या बाजारपेठेत २० टक्क्यांहून अधिक हिस्सा मिळवला आहे.

प्रणव यांनी अदानी गॅस लिमिटेडला भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी लिस्टेड सिटी गॅस वितरण कंपनी बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) नॅशनल कौन्सिल ऑन अॅग्रीकल्चर आणि एफएमसीजीचे सदस्य आहेत.

प्रणव अदानी यांनी नम्रता यांच्यासोबत विवाह केला आहे. नम्रता अदानी या अदानी एंटरप्रायजेसच्या नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. नम्रता या त्यांच्या 'अभिसार' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रीय आहे. दरम्यान, अदानी समूहाच्या वाढीत आणि विस्तारात प्रणव अदानी यांचा मोलाचा वाटा आहे.