सरकारी शाळेत शिकले, शेतात राबले; ही व्यक्ती कोण ज्यांना रतन टाटा यांनी १३५ कोटींचे पॅकेज दिले?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 04:17 PM2024-09-07T16:17:24+5:302024-09-07T16:22:19+5:30

शेतात काम करणारा, सरकारी शाळेत शिकलेला व्यक्ती आज एवढ्या मोठ्या कंपनीचा गाडा हाकत आहे.

कोळशाच्या खाणीतून हिरा सापडतो ना अगदी तसा प्रकार देशातील सर्वात मोठा बिझनेस ग्रुप टाटा संसचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्याबाबतीत घडला असे म्हणता येईल. प्रचंड मेहनत घेऊन ते या पदावर पोहोचले आहेत. त्यांच्या नेतृत्वात टाटा ग्रुप प्रगती करत आहे.

रतन टाटा देखील चंद्रशेखरन यांच्यावर प्रचंड विश्वास दर्शवितात. अशा या चंद्रशेखरन यांच्या पगारामध्ये यंदा घसघशीत म्हणजेच २० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. शेतात काम करणारा, सरकारी शाळेत शिकलेला व्यक्ती आज एवढ्या मोठ्या कंपनीचा गाडा हाकत आहे.

टाटा सन्सच्या अध्यक्षांचे वार्षिक पॅकेज २० टक्क्यांनी वाढून १३५.३२ कोटी झाले आहे. यामध्ये १२१.५ कोटींचे कमिशन आहे. या पगारवाढीसोबत चंद्रशेखरन देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या लोकांमध्ये सहभागी झाले आहेत. चंद्रशेखरन हे ६१ वर्षांचे आहेत.

टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सने एन चंद्र शेखरन यांच्या नेतृत्वाखाली 2023-24 या आर्थिक वर्षात निव्वळ नफ्यात 74 टक्के वाढ नोंदवली आहे. 6 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या फर्मच्या 106 व्या वार्षिक अहवालानुसार, तो 49,000 कोटी रुपये आहे.

कंपनीचा एकूण महसूल 14.64 टक्क्यांनी वाढून 4.76 लाख कोटी रुपये झाला आहे. वार्षिक अहवालानुसार, समूहाने कंपनीच्या कामगिरीच्या आधारे 35,000 रुपयांचा लाभांश दिला आहे, जो उच्चांकी आहे.

चंद्रशेखरन यांचा जन्म तामिळनाडूच्या मोहनूरमध्ये 1963 ला झाला होता. त्यांचे आई-वडील शेतकरी होते. सुरुवातीचे शिक्षण हे सरकारी शाळेतून झाले. नंतर त्यांनी कोईम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून शिक्षण घेतले. तिरुचिरापल्लीच्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून एमसीए केले.

१९८७ मध्ये ते टीसीएसमध्ये इंटर्न म्हणून नोकरीला लागले. २००७ मध्ये त्यांना सीओओ बनविण्यात आले. त्यानंतर लगेचच दोन वर्षांनी ते टीसीएसचे सीईओ बनले. २०१६ मध्ये त्यांना संचालक मंडळावर घेतले गेले. आता ते रतन टाटांचे राईट हँड बनले आहेत.