‘अशी’ वाढतील देशात इलेक्ट्रिक वाहने; जाणून घ्या ‘हे’ पाच मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 10:43 AM2022-10-07T10:43:43+5:302022-10-07T10:54:23+5:30

ईव्ही निर्मितीत टॉपला असलेल्या चीनमध्ये ३०० पेक्षा अधिक कंपन्या वाहने बनवत असून, ५ लाख चार्जिंग पॉइंट असल्याचे सांगितले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : चीन हा इलेक्ट्रिक वाहनांचा (ईव्ही) जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारा बाजार आहे. २०२२ मध्ये चीनमधील इव्हींची विक्री दुपटीने वाढून ६० लाख वाहनांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. हा आकडा संपूर्ण जगात विकल्या जाणाऱ्या एकूण इव्हींच्या संख्येपेक्षा अधिक आहे.

जगात टॉप- १० इव्ही ब्रँडपैकी अर्धे ब्रँड चीनमधील आहेत. चीनमधील सियाक आणि बीवायडी या ईव्ही उत्पादक कंपन्यांच्या पुढे फक्त अमेरिकेची टेस्ला आहे. चीनच्या ईव्ही क्षेत्रातील आघाडीमागे प्रमुख ५ कारणे आहेत. भारताला या क्षेत्रात बाजी मारायची असेल, तर या पाच मार्गांचा अवलंब करावा लागेल, असे जाणकारांना वाटते.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी २०१४ मध्येच इव्ही वाहनांच्या उत्पादनास प्रोत्साहन देणारी धोरणे आखली होती. २०२५ पर्यंत २० टक्के इव्ही विक्रीचे उद्दिष्ट त्यांनी निश्चित केले होते. हे उद्दिष्ट चीन २०२२ च्या अखेरपर्यंतच पूर्ण करणार आहे. जाणून घेऊ या हे पाच मुद्दे

सबसिडीवर लक्ष - इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात वाहनांची किंमत हा महत्त्वाचा आहे. महागड्या गाड्या विकल्या जात नाहीत. त्यावर मात करण्यासाठी चीनने उत्पादक, पुरवठादार आणि ग्राहक यांना ३३ टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली.

टेस्लासाठी बदलले नियम - विदेशी कंपनीस चीनमध्ये प्रकल्प उभारायचा असल्यास स्थानिक कंपनीशी भागीदारी करावी लागते. तथापि, अमेरिकी ईव्ही उत्पादक टेस्लासाठी चीनने हा नियम बदलला. टेस्लाला स्वबळावर प्रकल्प स्थापण्याची परवानगी मिळाली. चिनी ईव्ही उत्पादकांना तगड्या स्पर्धेला तोंड देण्याची सवय लागावी, यासाठी हा निर्णय चीन सरकारने घेतला.

बॅटरी उत्पादन - ईव्हीमध्ये सर्वाधिक खर्च बॅटरीचा असतो. चीनने बॅटरी उत्पादनास प्रोत्साहन दिले. आज जपान, कोरिया आणि चीन हे बॅटरी उत्पादनातील जागतिक खेळाडू आहेत.

पायाभूत सुविधा- चार्जिंग पॉइंट आणि बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्सच्या पायाभूत सुविधा निर्मितीस चीनने राष्ट्रीय प्राधान्य दिले.

चीनमध्ये ५ लाख चार्जिंग पॉइंट. २०२३ पर्यंत २०० बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आहे. ३०० पेक्षा अधिक कंपन्या चीनमध्ये इव्ही बनवितात.