EPF बॅलन्स तपासण्यासाठी वेबसाईटवर लॉगइन करण्याची गरज नाही; काही सेकंदात मिळणार माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:48 AM 2024-11-11T11:48:43+5:30 2024-11-11T11:52:17+5:30
EPF Balance: जर तुमच्या EPF खात्यातील शिल्लक तपासायची असेल तर आता वेबसाईटवर जाऊन लॉगइन करण्याची गरज नाही. EPFO ने आता सदस्यांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही एक सरकारी योजना आहे. यामध्ये कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी पैसे गुंतवतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (EPFO) ही योजना चालवली जाते.
जर तुम्ही EPF सदस्य असाल आणि तुमच्या खात्यातील EPF शिल्लक तुम्हाला तपासायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. साधारणपणे, लोक ईपीएफओच्या वेबसाइटवर लॉग इन करून ईपीएफ खात्यातील शिल्लक तपासतात. मात्र, या प्रक्रिया थोडी किचकट आहे. EPFO ने ईपीएफ खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे.
तुम्हाला तुमच्या EPF खात्यातील बॅलन्स तपासायचा असेल तर आता फक्त एका मिस्ड कॉलवर काम होणार आहे. यासाठी तुमचा मोबाईल नंबर युनिफाइड पोर्टलवर युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) वर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
जर तुमचा UAN तुमच्या आधार कार्ड किंवा पॅन कार्डशी लिंक असेल, तर तुम्हाला फक्त 9966044425 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल.
या नंबरवर मिस्ड कॉल दिल्यानंतर, तुमचा कॉल आपोआप डिस्कनेक्ट होईल आणि तुम्हाला तुमच्या UAN मध्ये लिंक केलेल्या कोणत्याही KYC तपशीलांवर आधारित मेसेजद्वारे शिल्लक माहिती मिळेल.
या कॉलसाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. पण, मिस्ड कॉल देण्यासाठी तुमच्या EPF खात्यात नोंदणीकृत असलेला मोबाइल नंबरच वापरा.