PF Account वर मिळतो ७ लाखांचा विमा, कोरोनानं मृत्यू झाल्यासही मिळते आर्थिक मदत; कसं ते वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 08:59 PM 2022-01-20T20:59:52+5:30 2022-01-20T21:04:25+5:30
तुम्ही नोकरदार असाल आणि पीएफ देखील पगारातून जमा होत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यावर ७ लाखांचा विमा मिळवू शकता हे माहित्येय का? कसं ते जाणून घेऊयात... EPFO चे सर्व सदस्य एम्पॉइज डिपॉझिट लिंक्ड इंश्युरन्स स्कीम १९७६ (EDLI) अंतर्गत कव्हर होतात. यामाध्यमातून EPFO च्या प्रत्येक सदस्याला ७ लाखांपर्यंत विमा मिळतो.
EPFO ची ही योजना ५ कोटींहून अधिक सदस्यांसाठी उपलब्ध आहे. EDLI योजनेअंतर्गत नोकरदाराचा आजार, अपघात किंवा मृत्यूनंतर या योजनेचा लाभ मिळवता येतो.
एखाद्या सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित सदस्याच्या कुटुंबातील व्यक्तीला EDLI य़ोजनेअंतर्गत ७ लाख रुपये मिळू शकतात.
कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीकडून क्लेम केला जाऊ शकतो. जर सदस्यानं नॉमिनेशन केलं नसेल तर कायद्यानुसार उत्तराधिकारी ठरवून क्लेम दिला जातो. अशावेळी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या साथीदार किंवा मुलांना लाभार्थी ठरवलं जातं.
क्लेमसाठी केवळ एकच अट कर्मचाऱ्याच्या मृत्यूआधी तो वर्षभर एखाद्या कंपनीत कार्यरत असणं गरजेचं आहे. क्लेमवेळी इन्श्युरन्स कंपनीला कर्मचाऱ्याचं मृत्यू प्रमाणपत्र, नॉमिनीची आणि बँकेची माहिती देणं गरजेचं असणार आहे.
कसा कराल क्लेम? कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर नॉमिनीला क्लेम करण्यासाठी फॉर्म-५ IF जमा करावा लागतो. या फॉर्मवर संबंधित कर्मचाऱ्याच्या कंपनीनंही सत्यमापन पडताळणी करणं गरजेचं आहे.
EDLI स्कीममध्ये केवळ कंपनीकडून प्रिमीअम जमा केला जातो. जो कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरी आणि महागाई भत्त्याचा ०.५० टक्के इतका असतो. यात बेसिक सॅलरीची मर्यादा १५ हजार इतकी निर्धारित करण्यात आली आहे.
EDLI योजनेअंतर्गत क्लेम हा कर्मचाऱ्याच्या शेवटच्या १२ महिन्यांच्या वेतनावर आधारभूत असतो. ताज्या संशोधनानुसार इन्श्युरन्स कव्हरचा क्लेम शेवटच्या बेसिक + DA च्या ३५ पट असेल. यात १.७५ लाख रुपयांचा बोनस जोडला जाईल.
उदाहरणार्थ, सामान्यत: एका कर्मचाऱ्याची शेवटच्या १२ महिन्यांची बेसिक सॅलरी + DA, जी १५ हजार रुपये इतकी असेल. म्हणजेच इन्श्युरन्स क्लेम (35x15000)+ 1,75,000 रुपये= ७ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम होते.