पेट्रोल-डिझेलवर नव्हे, तर देशात १००% इथेनॉलवर चालणार वाहनं; पियुष गोयल यांनी सांगितला प्लान By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 08:04 PM 2021-07-17T20:04:57+5:30 2021-07-17T20:09:44+5:30
Ethanol blending petrol: देशाचे नवनिर्वाचित वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मोठी घोषणा केलीय. देशातील सर्व वाहनं इथेनॉलवर चालविण्याचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे. केंद्र सरकारनं २०२३-२४ पर्यंत देशातलं इथेनॉल ब्लेडिंगचं उद्दीष्ट २० टक्के इतकं ठेवलं आहे. पण भविष्यात देशातील वाहनं १०० टक्के इथेनॉवर चालतील असं लक्ष्य केंद्र सरकारनं ठेवलं आहे.
येत्या काळात बॅटरी टेक्नोलॉजीची मागणी वाढणार आहे. अक्षय्य ऊर्जा सेक्टरमध्ये विकास होणार असून त्यामुळे बॅटरी इंडस्ट्रीमध्येही मोठा बदल होईल, असं पियुष गोयल यांनी सांगितलं.
अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्याचं उद्दीष्ट केंद्र सरकारनं ठेवलं असून भविष्यात वाहनं १०० टक्के इथेनॉलवर चालतील असं तंत्रज्ञान विकसीत करण्याचं काम आम्ही करत आहोत, असं पियुष गोयल म्हणाले.
ज्यांच्याकडे इलेक्ट्रीक कार आहे अशांनी सौरऊर्जा किंवा अक्षय्य ऊर्जेच्या माध्यमातून चार्ज करावीत. यासाठी भविष्यात जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील, असंही गोयल म्हणाले.
२०२२ पर्यंत अक्षय्य ऊर्जेचं लक्ष्य १७५ गिगावॅट इतकं ठेवण्यात आलं आहे. तर २०३० सालापर्यंत हेच लक्ष्य ४५० गिगावॅट इतकं आहे. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इथेनॉल मिस्किंगचं लक्ष्य २०३० हून २०२५ पर्यंतचं केल्याची घोषणा केली आहे.
याआधी इथेनॉलवर ब्लेंडिंगचं उद्दीष्ट २०२२ पर्यंत १० टक्के, तर २०३० पर्यंत २० टक्के इतकं ठेवण्यात आलं होतं. आता यात पाच वर्षांची घट करण्यात आली आहे. सध्या देशात पेट्रोलमध्ये ८.५ टक्के इथेनॉलचं मिश्रण केलं जात आहे. २०१४ साली हे प्रमाण फक्त १ ते १.५ टक्के इतकं होतं.
देशात अक्षय्य ऊर्जा वापरातही मोठ्या प्रमाणात वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत तब्बल २५० टक्क्यांची वाढ या क्षेत्रात दिसून आली आहे. जगात अक्षय्य ऊर्जेचा वापर केल्या जाणाऱ्या प्रमुख पाच देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.
मजबूत अर्थव्यवस्था आणि पर्यावरण अशा दोन्ही एकत्रित प्रयत्न करण्याचा सरकारचा निर्धार असून पर्यावरण बदलाच्या परफॉर्मंन्स इंडेक्समध्येही भारताचा टॉप-१० देशांमध्ये समावेश आहे, असंही गोयल यांनी यावेळी स्पष्ट केलं.