चाळीत राहायचं कुटुंब, ५ लाखांपासून केली व्यवसायाची सुरुवात; आज जगभरात पसरलाय व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 08:35 AM2024-01-04T08:35:45+5:302024-01-04T08:44:55+5:30

आज गौतम अदानी यशाच्या नवनव्या शिखरांना स्पर्श करत असले तरी त्यांना व्यवसायाचा वारसा कोणाकडूनही मिळालेला नाही.

आज गौतम अदानी यशाच्या नवनव्या शिखरांना स्पर्श करत असले तरी त्यांना व्यवसायाचा वारसा कोणाकडूनही मिळालेला नाही. गौतम अदानी यांनी स्वतः आपलं साम्राज्य निर्माण केलंय. गौतम अदानी यांनी आयुष्यात एवढं मोठं यश कसं मिळवलं ते आपण आज जाणून घेऊ.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समध्ये (Bloomberg Billionaires Index) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी १५ व्या क्रमांकावर आहे. तर मुकेश अंबानी या यादीत १३ व्या क्रमांकावर आहेत. अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी वेगाने पुढे जात आहेत.

गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ८५.९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप १५ लाख कोटींच्या पुढे गेले आहे. तर मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ९७.२ अब्ज डॉलर्स आहे.

गौतम अदानी यांचा जन्म २४ जून १९६२ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. गौतम अदानी यांना बालपणी खूप संघर्ष करावा लागला. वडिलांना घर चालवायला मदत करण्यासाठी वयाच्या १६ व्या वर्षी ते अहमदाबादमध्ये घरोघरी साड्या विकायचे. अदानी यांचे कुटुंब अहमदाबादच्या पोळ भागातील शेठ चाळीमध्ये राहत होते.

मध्यमवर्गीय कुटुंबातील गौतम अदानी यांचं शालेय शिक्षण अहमदाबादच्या शेठ चिमणलाल नगिनदास विद्यालयातून झाले. त्यानंतर त्यांनी गुजरात विद्यापीठात कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला, मात्र दुसऱ्या वर्षात शिक्षण सोडून ते मुंबईला आले. गौतम अदानी मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे फक्त १०० रुपये होते.

मुंबईत आल्यावर गौतम अदानी यांचा व्यावसायिक प्रवास सुरू झाला. त्यांनी डायमंट सॉर्टर म्हणून कामाला सुरुवात केली आणि काही वर्षांतच झवेरी बाजार, मुंबई येथे स्वतःची डायमंड ब्रोकरेज फर्म सुरू केली. त्यानंतर काही वर्षे मुंबईत राहिल्यानंतर ते पुन्हा अहमदाबादला आपल्या भावाच्या प्लॅस्टिक कंपनीत काम करण्यासाठी आले.

सध्या गौतम अदानी यांचा व्यवसाय अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. एकीकडे, ते कोळसा खाण क्षेत्रातील सर्वात मोठे कॉन्ट्रॅक्ट मायनर बनले आहेच. गेल्या तीन वर्षांत त्यांनी देशातील सात विमानतळांचे कामकाज हाती घेतलं आहे. त्यांचा समूह हा देशातील सर्वात मोठा खाजगी क्षेत्रातील एअरपोर्ट ऑपरेटर, पॉवर जनरेटर आणि सिटी गॅस रिटेलर आहे.

आज गौतम अदानी यांच्याकडे लक्झरी कारपासून ते खासगी जेटपर्यंत सर्व काही आहे. अदानी त्यांच्या प्रायव्हेट जेटने प्रवास करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या मालकीच्या सर्वात स्वस्त खाजगी जेटची भारतात किंमत १५.२ कोटी रुपये आहे. कमी अंतराच्या प्रवासासाठी त्यांनी हेलिकॉप्टरही ठेवलं आहे.

गौतम अदानी आपल्या कुटुंबासह आलिशान बंगल्यात राहतात. त्याच्याकडे एक नाही तर अनेक बंगले आहेत. रिपोर्टनुसार, २०२० मध्ये त्यांनी दिल्लीच्या लुटियन्स भागात एक बंगला खरेदी केली आहे, ज्याची किंमत सुमारे ४०० कोटी रुपये आहे. सर्वाधिक बोली लावून त्यांनी ती खरेदी केली होती. याशिवाय अहमदाबादमधील पॉश कॉलनीमध्येही त्यांचा एक बंगला आहे. गुरुग्राममध्येही त्यांचा बंगला आहे.