तुम्हाला देखील Home Loan चा EMI वाटतोय ओझं? या स्मार्ट पद्धतीनं लवकर फेडू शकता लोन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 09:32 AM2023-08-07T09:32:32+5:302023-08-07T09:56:16+5:30

स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. बहुतांश लोक आपलं स्वप्न साकार करण्यासाठी होमलोनचा पर्याय स्वीकारतात.

स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. काही लोक फ्लॅट खरेदी करतात, तर काही लोक जागा घेऊन त्यावर आपल्याला हवं तसं घर बांधून घेतात. बहुतेक लोक घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी होमलोनचा पर्याय स्वीकारतात.

नोकरी मिळाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांत गृहकर्जाचा ईएमआय भरण्यास कोणतीही अडचण येत नाही. परंतु हळूहळू जबाबदाऱ्या वाढू लागतात. जबाबदाऱ्या वाढल्या की तुमच्यावरचा आर्थिक बोजा वाढू लागतो आणि होमलोनचा EMI एक ओझं वाटू लागतं. काही लोक तर घर विकून होमलोनमधून बाहेर पडू असा विचार करतात. जर तुम्ही देखील होमलोनच्या ईएमआय बोजा वाटत असेल तर तो कमी कसा करायचा हे पाहू.

जेव्हा तुम्ही होमलोन घेता तेव्हा त्याचा एक निश्चित ईएमआय असेल, जो तुम्हाला दरमहा भरावा लागेल. दुसरीकडे, दरवर्षी तुमचा पगार थोडा वाढत जाईल आणि काही वर्षांनी तुमच्या जबाबदाऱ्याही वाढतील. अशा परिस्थितीत, नोकरीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात गृहकर्जाचा ईएमआ जास्त ठेवा, कारण त्यावेळी तुम्ही एकटे असाल तर तुमचे खर्च तुलनेनं कमी असतील.

जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचा पगार तुमच्या खर्चापेक्षा अधिक आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या होमलोन रिस्ट्रक्चर करून घ्या. वाढलेल्या पगारामुळे, तुम्ही ईएमआय वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून कर्ज परतफेडीचा कालावधी कमी करता येईल. याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला एकूण व्याज कमी द्यालं लागेल. यासोबतच तुमचं होमलोन थोडे आधी फेडलं जाईल.

समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 30 वर्षांसाठी 40 लाख रुपयांचे कर्ज घेतलं आहे. जर तुम्ही हे कर्ज 8.5 टक्के दरानं घेतलं असेल तर तुम्हाला दरमहा सुमारे 30 हजार रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. जर तुम्ही असेच पैसे भरत राहिलात तर या 30 वर्षांत तुम्हाला सुमारे 70 लाख रुपये व्याज द्यावं लागेल.

दुसरीकडे, जर तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात तुमच्या होमलोनचा ईएमआय वाढवला किंवा कर्जाचा कालावधी कमी केला, तर तुमचे बरेच पैसे वाचतील. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कर्जाचा ईएमआय भरण्यात अडचण येत आहे, तेव्हा त्याची पुनर्रचना करा, तसंच तुमच्यानुसार ईएमआय करून घ्या.

पैसे वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचे खर्च मॅनेज करणं. जर तुम्ही तुमचे काही आवश्यक खर्च कमी करून तुमचा ईएमआय 5-10 टक्क्यांनी वाढवू शकता, तर ते तुमच्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करेल. परिणामी तुम्हाला कमी व्याज द्यावं लागेल. प्रत्येक महिन्यासाठी खर्चाचं बजेट ठेवा आणि त्यानुसार पैसे खर्च करा. त्यापेक्षा जास्त पैसे खर्च न करण्याचा प्रयत्न करा.

बहुतांश कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक बोनस देतात. जर तुम्हाला यात मोठी रक्कम मिळाली तर ती रक्कम कर्जाच्या प्रीपेमेंटासाठी वापरा. यामुळे तुमच्या गृहकर्जावरील प्रिन्सिपल अमाऊंट कमी होती. यामुळे तुमचा ईएमआय तरी कमी होईल किंवा कर्जाच्या परतफेडीचा कालावधी तरी कमी होईल. याचा निर्णय तुमचा असेल. दरवर्षी तुमच्या गृहकर्जाचे काही प्री पेमेंट करण्याचा प्रयत्न करा, ज्याचा तुम्हाला फायदा होईल.

जर तुम्ही होमलोन घेण्याचा विचार करत असाल तर ईएमआय इतकाही वाढवू नका की तो फेडण्यात तुम्हाला अडचण येईल. साधारणपणे गृहकर्जाचा ईएमआय तुमच्या इनहँड पगाराच्या 20-25 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त नसावा.

जर तुम्ही अविवाहित असाल आणि तुमच्यावर कोणतीही जबाबदारी नसेल, तर सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही ईएमआय 30-35 टक्के ठेवू शकता, परंतु त्यापेक्षा जास्त ठेवू नका. जेव्हा जबाबदाऱ्या वाढतात तेव्हा तुमच्या गृहकर्जाची पुनर्रचना करा जेणेकरून तुम्ही तुमच्या सोयीनुसार कर्जाची परतफेड करू शकाल.