पहिलं स्टार्टअप फेल, खिशात दमडी नाही; पैसे उसने घेऊन सुरू केला व्यवसाय, वर्षाला कमावतो कोट्यवधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 10:16 AM2023-09-08T10:16:22+5:302023-09-08T10:27:14+5:30

८ लाखांचं नुकसान सोसूनही बनवली २५ कोटींच्या टर्नओव्हरची कंपनी.

यशस्वी होण्यासाठी जसं कठोर परिश्रम आवश्यक आहेत, तसंच संकटांचा जिद्दीनं सामना करण्याची गरज आहे. व्यवसाय म्हटलं की यश अपयश हे आलंच. पण, जो अपयशाने खचून जात नाही, शेतात खंबीरपणे उभा राहतो आणि यश मिळवण्यासाठी जिद्द सोडत नाही, तो एक दिवस नक्कीच यशस्वी उद्योजक बनतो.

फूड स्टार्टअप मोमोमियाचे संस्थापक देबाशिष मजुमदार हे याचे जिवंत उदाहरण आहेत. एक अशी वेळ होती जेव्हा त्यांच्या खिशात २०० रुपयेही नव्हते आणि त्यांना आपल्या पत्नीला साध्या चपलाही घेता आल्या नव्हत्या. पण आज त्यानी आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठा व्यवसाय उभा केला असून वर्षाला कोट्यवधी रुपये कमवत आहेत.

एका बंगाली कुटुंबात जन्मलेल्या देबाशिष यांचं लहानपणापासूनच उद्योजक बनण्याचं स्वप्न होते. पण, कुटुंबाचा उदरनिर्वाह नीट व्हावा यासाठी त्यांना शिक्षणानंतर चांगली नोकरी मिळावी, अशी कुटुंबीयांची इच्छा होती.

देबाशिष यांचे आजोबा अनेकदा म्हणायचे की, माणसानं पैसे कमवण्यावर नव्हे तर नाव कमवण्यावर जास्त भर द्यावा. त्यांच्या बोलण्याचा देबाशिषवर यांच्यावर परिणाम झाला. ते व्यवसाय करण्याचं स्वप्न पाहू लागले. पण, ते आपला व्यवसाय सुरू करतील अशी घरची परिस्थिती नव्हती.

देबाशिष अभ्यासात हुशार होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच त्याला बँकेत नोकरी लागली. त्यांचा पगार १८०० रुपये होता. पहिला पगार मिळाला पण त्यानंतर त्यांनी आईकडे नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केली. आईने नकार दिला आणि कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला.

आईचा सल्ला मानून देबाशिष पूर्ण मनाने काम करू लागले. त्यांनी खूप मेहनत केली आणि बँकेत चांगल्या पदावर पोहोचले. पण, त्यांनी उद्योजक होण्याचं स्वप्न कधीच सोडलं नाही. व्यवसाय सुरू करण्यासाठी ते पैशांची बचतही करत होते.

काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. नोकरी सोडली तेव्हा त्यांना महिन्याला एक लाख रुपये पगार मिळत होता. त्यांनी २०१६ मध्ये आपली सर्व बचत गुंतवून आईस्क्रीमचं स्टार्टअप सुरू केले. यामध्ये त्यांनी आपले सर्व जमा केलेले पैसे गुंतवले आणि काही पैसे उसनेही घेतले. पण, दुर्दैवानं त्यात त्यांना यश मिळालं नाही. देबाशिष यांना ते वर्षभरातच बंद करावं लागलं. त्यांचं एकूण आठ लाख रुपयांचं नुकसान झालं आणि ते कर्जाखाली दबले गेले.

आईस्क्रीम स्टार्टअप यशस्वी न झाल्यानं देबाशिष यांची आर्थिक स्थिती खराब झाली. एकदा त्याच्याकडे सणासुदीला पत्नीसाठी नवीन चपला घेण्यासाठी २०० रुपयेही नव्हते. आर्थिक स्थितीमुळे त्यांना आपल्या आईची शस्त्रक्रियाही करता आली नाही. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता.

देबाशिष मजुमदार गुवाहाटी येथील एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तिथे त्यांनी मोमोज ऑर्डर केले. त्यांना रेस्टॉरंटनं दिलेल्या मोमोजचा दर्जा आणि चव दोन्ही आवडलं नाही. मग त्याच्या मनात मोमोज आउटलेट सुरू करण्याचा विचार आला. मोमोजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांना खात्री होती की त्यांनी चांगल्या दर्जाचे आणि व्हरायटी असलेले चांगले मोमोज लोकांना दिले तर त्याची विक्रीही चांगली होईल.

२०१८ मध्ये त्यांनी गुवाहाटीत मोमोमियाचे पहिलं आउटलेट उघडलं. १० टक्के वार्षिक व्याजावर साडेतीन लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी हे काम सुरू केलं. त्यांची विक्रीही चांगली होत होती. पहिली दोन वर्षे त्यांना खूप मेहनत करावी लागली. २०२० येईपर्यंत त्यांचा या व्यवसायात जम बसला. त्याच वर्षी, मोमोमियाचं पहिलं फ्रँचायझी आउटलेट उघडलं गेलं. यानंतर मोमोमियानं रॉकेटच्या वेगाने प्रगती केली.

आज मोमोमियाचे देशभरात १०० हून अधिक आउटलेट आहेत. देबाशिष मोमोमियाची फ्रँचायझी देतात. फ्रँचायझीकडून फ्रँचायझी फी म्हणून त्यांना अडीच लाख रुपये मिळतात. त्यांना एकूण विक्रीवर ५ टक्के रॉयल्टी मिळते. मोमोमिया आउटलेट्सवर तुम्हाला मोमोजचे बरेच प्रकार मिळतील. आज देबाशिष यांच्या मोमोमिया कंपनीची उलाढाल वार्षिक २५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ते आता सुमारे ४०० लोकांना रोजगार देत आहेत.