फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा? By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 08:44 AM 2024-10-25T08:44:46+5:30 2024-10-25T08:58:11+5:30
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या महिन्यात भारतीय बाजारातून सुमारे ८२,००० कोटी रुपये काढून घेतले आहेत. एका महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी विक्री आहे. Share Market Worst Month : शेअर बाजारात या महिन्यात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्सची जोरदार विक्री केली. तर दुसरीकडे कंपन्यांचे तिमाही निकालही अपेक्षेप्रमाणे आलेले नाहीत. यामुळे हा ऑक्टोबर महिना २०२० नंतरचा शेअर बाजारासाठी सर्वात वाईट ऑक्टोबर सिद्ध होत आहे.
शेअर बाजारातील घसरण गुरुवारी सलग चौथ्या दिवशीही कायम राहिली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना घाम फुटला आहे. ऑक्टोबरमध्ये सेन्सेक्स तब्बल ५ टक्क्यांनी घसरला आहे. ही घसरण जून २०२२ मधील ४.५८ टक्क्यांच्या घसरणीपेक्षाही अधिक आहे.
अलीकडच्या वर्षांतील सर्वात मोठी घसरण फेब्रुवारी आणि मार्च २०२० मध्ये कोविड दरम्यान दिसून आली. त्यानंतर सेन्सेक्स अनुक्रमे ६ टक्के आणि २३ टक्क्यांनी घसरला. बीएसईवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल या महिन्यात २९ लाख कोटी रुपयांनी घटले आहे. मात्र, देशांतर्गत गुंतवणूकदार बाजारात मजबूत आहेत.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) या महिन्यात भारतीय बाजारातून सुमारे ८२,००० कोटी रुपये काढून घेतले आहेत. एका महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी विक्री आहे. कोविडच्या काळात होणाऱ्या विक्रीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. भारतीय शेअर बाजार एवढ्या वरच्या पातळीवर व्यवहार करत नसतं तर परदेशी गुंतवणूकदारांची विक्री एवढी जास्त झाली नसती, असं तज्ज्ञांचं मत आहे.
कंपन्यांचे तिमाही निकालही उत्साहवर्धक आलेले नाहीत. यामुळे बाजाराची धारणा आणखी कमकुवत झाली आहे. याशिवाय ह्युंदाई इंडियासारख्या बड्या कंपन्यांच्या आयपीओ आणि क्यूआयपीच्या माध्यमातून निधी उभारण्यातूनही बाजारातून पैसे बाहेर जात आहेत. आंतरराष्ट्रीय तणाव आणि पुढील महिन्यात होणाऱ्या अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालाबाबतची अनिश्चितताही काही गुंतवणूकदारांना सतर्क करत आहेत.
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपन्यांच्या उत्पन्नातील वाढ १० टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ती २६ टक्के होती. निफ्टी ५० कंपन्यांच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत केवळ २ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिले आहेत. गोल्डमन सॅक्सनं भारतीय शेअर बाजाराचं रेटिंग 'ओव्हरवेट'वरून 'न्यूट्रल'वर आणला आहे. उच्च मूल्यांकन आणि बाजारातील कमकुवत भावना नजीकच्या काळात बाजाराच्या वाढीवर मर्यादा आणू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. इन्क्रेड इक्विटीजच्या एक्सपर्ट्सनंही निफ्टीचं टार्गेट ३ टक्क्यांनी कमी करून २५,९७८ वर आणलं. उच्च मूल्यांकनामुळे डिसेंबर २०२४ तिमाहीपर्यंत बाजारात घसरण सुरू राहू शकते, असं त्यांचं म्हणणं आहे.
परंतु काही काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपन्यांच्या कमाईत सुधारणांची अपेक्षा असल्याचं म्हटलं जातंय. त्यात सुधारणा झाल्यास बाजारात तेजी येऊ शकते असंही त्यांचं म्हणणं आहे.