अ‍ॅडव्हान्स PF मिळवा फक्त एका मेसेजवर; काय आहे 'फ्रीडम २०२१' सुविधा? जाणून घ्या सोप्या शब्दात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 05:21 PM2022-07-24T17:21:30+5:302022-07-24T17:26:53+5:30

तुम्हाला आर्थिक गरज असेल आणि पीएफ काढण्याचा विचार करत असाल तर तो अगदी सहजपणे कसा काढता येईल हे जाणून घ्या..

मोबाइलच्या माध्यमातून फक्त एका मेसेजवर तुम्ही तुमचा PF काढू शकता. तुम्हाला फार काही करायचं नाही फक्त रजिस्टर्ज मोबाइल नंबरवरुन एक मेसेज करायचा आहे. इतर सर्व पुढचं काम ईपीएफ कार्यालय करेल.

फक्त एकदा तुम्हाला नजिकच्या ईपीएफओ कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. या नव्या सेवेचं नाव फ्रीडम-२०२१ असं आहे.

ईपीएफओची ही नवी सेवा कोईम्बतूरच्या रिजनल ऑफीसमध्ये सुरू करण्यात आली आहे. कोरोना काळात ही सेवा सुरू करण्यात आली जेणेकरुन नागरिकांना फक्त एका मेसेजवर पीएफ मिळवता येईल आणि त्यांच्या अडचणी सोडवता येतील.

कोरोना काळात अनेकांना आर्थिक गरज निर्माण झाली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे अ‍ॅडव्हान्स पीएफ नोकरदारांना मिळावा यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली. या सेवात तुम्हाला फक्त एका निर्धारित फॉरमॅटमध्ये मेसेज पाठवायचा आहे. याच मेसेजच्या आधारावर पीएफ विड्रॉव्हलची प्रक्रिया सुरू होते.

एका घटनेच्या माध्यमातून या सेवेचा फायदा समजून घेऊयात. कोइम्बतूरमधील पलानीअप्पन यांना त्यांचा पीएफ काढायचा होता आणि ते इपीएफओ कार्यालयात जाणार होते. त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न करायचा होतं आणि त्यासाठी पैशांची गरज होती.

यावेळी त्यांच्या मुलानं वृत्तपत्रातील एक बातमी वाचली आणि यात एका एसएमएसच्या माध्यमातून पीएफ काढण्याची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती होती. कोइम्बतूरच्या पीएफ रिजनल ऑफीसकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला होता.

पलानीअप्पन यांनी तात्काळ आपल्या मोबाइलमधून निर्धारित फॉरमॅटमध्ये मेसेज केला. त्यानंतर पलानीअप्पन यांना त्यांच्या मोबाइलमध्ये तारीख, वेळ, लाऊंज, काऊंटर आणि टोकन नंबर अशी सर्व माहिती आली. यात आवश्यक कागदपत्रांचीही माहिती देण्यात आली होती. तसंच अपॉइंटमेंटच्या १० मिनिटं आधी पीएफ कार्यालयात पोहोचण्याबाबत नमूद करण्यात आलं होतं.

पलानीअप्पन त्यांना देण्यात आलेल्या तारीख आणि वेळेत ते पीएफ कार्यालयात पोहोचले. यावेळी काऊंटवर सर्व आवश्यक कागदपत्र सुपूर्द केली आणि ते घरी परतले. काही दिवसांमध्ये पलानीअप्पन यांच्या बँक खात्यावर पीएफचे पैसे आले.

या सुविधेत हेल्पडेस्कची प्री-बुकिंग सुविधा एसएमएसद्वारे दिली जाते. लॉकडाऊन दरम्यान, कोईम्बतूरच्या आरओने 'Stay Home Slove All' नावाची मोहीम सुरू केली. यामध्ये पीएफ ग्राहकांना व्हॉट्सअॅप क्रमांक देण्यात आले. या संदेशावर आधारित सेवेला फ्रीडम २०२१ असे नाव देण्यात आले आहे.

पीएफ कार्यालयाच्या या सेवेमुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होते, वेळेसोबतच ऊर्जाही वाचते. त्यामुळे कोईम्बतूर पीएफ कार्यालयातील 80,000 ग्राहकांची ये-जा करणे सोपे झाले. त्याच्या एका मेसेजवरून पीएफचे अॅडव्हान्स पैसे निघाले.