1 October New Rules : Aadhaar, PPF, इन्कम टॅक्सपासून एलपीजीपर्यंत; आजपासून देशात १० मोठे बदल; खिशावर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 10:24 AM2024-10-01T10:24:42+5:302024-10-01T10:37:18+5:30

1 October New Rules : १ ऑक्टोबर (Rule Change From October 2024) म्हणजेच आजपासून देशभरात आधार कार्ड, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेसह इन्कम टॅक्ससारखे १० मोठे नियम बदलणार आहेत

Rules Change 1st October : आजपासून ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही अनेक मोठे बदल होणार आहेत. १ ऑक्टोबर (Rule Change From October 2024) म्हणजेच आजपासून देशभरात आधार कार्ड, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेसह इन्कम टॅक्ससारखे १० मोठे नियम बदलणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणारे. चला तर मग जाणून घेऊया आजपासून काय बदलणार?

एलपीजीची किंमत - पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींना पहिला धक्का बसला आहे. इंघन विपणन कंपन्यांनी ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी १९ किलोच्या कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. यामध्ये ३९ रुपयांची वाढ करण्यात आली. आता दिल्लीत कमर्शिअल सिलिंडरची किंमत १७४० रुपये आणि मुंबईत १६९२.५० रुपये झालीये.

ATF ची किंमत कमी - दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्याबरोबरच इंधन कंपन्या विमान इंधन म्हणजेच एटीएफ आणि सीएनजी-पीएनजीच्या किंमतीतही बदल करतात. सप्टेंबरमध्ये एटीएफच्या दरात कपात करण्यात आली होती. आता ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी दिलासा मिळाला असून ते स्वस्त झाले आहे. दिल्लीत आता याची किंमत ८७,५९७.२२ रुपये प्रति किलोलीटर झाली आहे.

HDFC क्रेडिट कार्ड - आजपासून एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड नियम बदलत आहेत. एचडीएफसी बँकेच्या काही क्रेडिट कार्डसाठी लॉयल्टी प्रोग्राममध्ये बदल करण्यात आलाय. यानुसार, एचडीएफसी बँकेनं स्मार्टबाय प्लॅटफॉर्मवर अॅपल प्रोडक्टसाठी रिवॉर्ड पॉईंट्सची रिडेम्प्शन प्रति कॅलेंडर तिमाही एका उत्पादनापुरती मर्यादित ठेवली आहे.

सुकन्या समृद्धी - सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित एक मोठा नियम बदलला असून हा बदलही १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाला आहे. याअंतर्गत मुलींच्या कायदेशीर पालकांनाच पहिल्या तारखेपासून ही खाती ऑपरेट करता येणार आहेत. नव्या नियमानुसार, जर एखाद्या मुलीचं एसएसवाय खातं तिचं कायदेशीर पालक नसलेल्या व्यक्तीनं उघडलं असेल तर तिला आता हे खातं नैसर्गिक पालक किंवा कायदेशीर पालकाकडे हस्तांतरित करावं लागेल. तसं न केल्यास खातं बंद होऊ शकतं.

पीपीएफ खातं - अल्पबचत योजनेअंतर्गत पीपीएफ योजनेत तीन मोठे बदल होणार आहेत. हे बदल आजपासून लागू होणार आहेत. २१ ऑगस्ट २०२४ रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाने नवीन नियमांसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वं जारी केली, ज्याअंतर्गत पीपीएफचे तीन नवीन नियम लागू केले जातील. याअंतर्गत जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त खाती असतील तर पहिल्या खात्यात दोन खाती विलीन करावी लागतील. आणखी दोन बदल अल्पवयीन मुलांच्या खात्याशी आणि एनआरआय खात्याशी संबंधित आहेत.

शेअर बायबॅक - १ ऑक्टोबरपासून शेअर बायबॅकच्या कराबाबत नवा नियम लागू होत आहे. आता भागधारकांना बायबॅक उत्पन्नावर कर भरावा लागणार आहे, जो लाभांशाच्या करावर लागू होईल. या बदलामुळे कंपन्यांकडून शेअरहोल्डर्सवर कराचा बोजा हस्तांतरित होणार आहे.

आधार कार्ड - आधार क्रमांकाऐवजी आधार नोंदणी आयडीचा उल्लेख करण्यासाठी मंजुरी देण्याची तरतूद बंद करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात देण्यात आला होता. पॅनचा गैरवापर आणि डुप्लिकेशन दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून पॅन अलॉटमेंटच्या अर्जात आणि प्राप्तिकर विवरणपत्रात यापुढे व्यक्ती आपला आधार नोंदणी आयडी नमूद करू शकणार नाहीत. अर्थसंकल्पानुसार, कायद्याच्या कलम १३९ एए नुसार पात्र व्यक्तींना १ जुलै २०१७ पासून पॅन अर्ज आणि इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये आधार क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे.

इन्कम टॅक्सचा नियम - २०२४ च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्स संदर्भात अनेक बदलांची घोषणा केली होती, जी १ ऑक्टोबरपासून बदलणार आहे. टीडीएस दर, डायरेक्ट टॅक्स डिस्प्यूट्स टू विश्वास स्कीम २०२४ यांचा समावेश आहे. टीडीएस अंतर्गत बाँड अंतर्गत फ्लोटिंग रेटवर १०% टीडीएस वजावट लागू होईल. त्याचबरोबर कलम १९ डीए, १९४ एच, १९४-आयबी आणि १९४ एम अंतर्गत पेमेंटसाठी टीडीएस दर कमी करण्यात आले आहेत. तो आता ५ ऐवजी २ टक्के करण्यात आलाय. याशिवाय डायरेक्ट टॅक्स डिस्प्यूट्स टू विश्वास स्कीम २०२४ सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत प्रलंबित कर प्रकरणं निकाली काढण्यात येणार आहेत.

क्रेडिट कार्डाचे नियम - पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) बचत खात्यांसाठी लागू असलेल्या काही क्रेडिट संबंधित सेवा खर्चात बदल करण्याची घोषणा केली आहे. या सुधारणांमध्ये किमान सरासरी शिल्लक राखणं, डिमांड ड्राफ्ट जारी करणं, डीडी, चेक (ईसीएससह), रिटर्नचा खर्च आणि लॉकर रेंट चार्ज यांचा समावेश आहे. नवे शुल्क १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाइटनुसार, १ ऑक्टोबर २०२४ पासून आपण शेवटच्या कॅलेंडर तिमाहीत १०,००० रुपये खर्च करून दोन कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्ट लाउंज अॅक्सेसचा आनंद घेऊ शकता.

F&O ट्रेडिंगशी संबंधित नियम - १ ऑक्टोबरपासून फ्युचर्स अँड ऑप्शनला (एफ अँड ओ) लागू होणारा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन रेट (एसटीटी) वाढणार आहे. ऑप्शन्सच्या विक्रीवरील एसटीटी प्रीमियम ०.०६२५% वरून ०.१% पर्यंत वाढेल. फ्युचर्स सेलवर एसटीटी ट्रेड प्राइसच्या ०.०१२५% वरून ०.०२% पर्यंत वाढेल.