Rule Change: एलपीजी ते क्रेडिट कार्डापर्यंत; १ नोव्हेंबरपासून होणार 'हे' ६ बदल, खिशावर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 10:48 AM2024-10-28T10:48:19+5:302024-10-28T10:56:02+5:30

ऑक्टोबर महिना संपत आला असून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. पहिल्या तारखेपासून हे बदल लागू केले जाणार असून त्याचा परिणाम प्रत्येकाच्या खिशावर होईल.

ऑक्टोबर महिना संपत आला असून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. दर महिन्याप्रमाणे नोव्हेंबर महिनाही अनेक मोठे बदल (Rule Change From 1st November) येत आहे. पहिल्या तारखेपासून हे बदल लागू केले जाणार असून त्याचा परिणाम प्रत्येकाच्या खिशावर होईल. यामध्ये जिथे एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल दिसून येऊ शकतो, तर दुसरीकडे क्रेडिट कार्डचे नियमही बदलणार आहेत. पाहूयात कोणते आहेत सहा मोठे बदल...

एलपीजी सिलिंडरच्या किंमती - दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder Price) किंमतीत बदल करून नवे दर जाहीर करतात. यंदाही १ नोव्हेंबरला त्याच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती यंदा कमी होतील, अशी लोकांची अपेक्षा आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर जुलै महिन्यात १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती, मात्र त्यानंतर सलग तीन महिन्यांपासून त्यात वाढ होत आहे. या काळात एलपीजी सिलिंडरच्या दरात ९४ रुपयांची वाढ झाली आहे. १ ऑक्टोबर रोजी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर ४८.५० रुपयांनी महागला होता.

एटीएफ आणि सीएनजी-पीएनजी दर - एकीकडे इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत सुधारणा करतात, तर दुसरीकडे सीएनजी-पीएनजीव्यतिरिक्त एअर टर्बाइन फ्यूलच्या (ATF) दरातही सुधारणा केली जाते. गेल्या काही महिन्यांपासून विमान इंधनाच्या दरात कपात झाली असून यंदाही दर कमी होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत मोठा बदल होऊ शकतो.

एसबीआय क्रेडिट कार्ड - आता देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेशी जोडलेल्या तिसऱ्या बदलाबद्दल बोलूया. स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) उपकंपनी एसबीआय कार्ड १ नोव्हेंबरपासून मोठे बदल लागू करणार आहे, जे आपल्या क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिल पेमेंट आणि फायनान्स चार्जेसशी संबंधित आहेत. क्रेडिट कार्ड रूल चेंजबद्दल सविस्तर माहिती घेतली तर १ नोव्हेंबरपासून अनसिक्युअर्ड एसबीआय क्रेडिट कार्डवर दरमहा ३.७५ फायनान्स चार्जेस भरावे लागतील. याशिवाय वीज, पाणी, एलपीजी गॅससह अन्य युटिलिटी सर्व्हिसेसमध्ये ५० हजार रुपयांपेक्षा अधिक पेमेंट केल्यास १ टक्के अतिरिक्त शुल्क भरावं लागणार आहे.

ट्रायचे नवे नियम - १ नोव्हेंबरपासून होणाऱ्या मोठ्या बदलांच्या यादीत पाचवा बदल टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित असून १ तारखेपासून हे नवे नियम लागू होऊ शकतात. वास्तविक, सरकारनं जिओ, एअरटेलसह सर्व टेलिकॉम कंपन्यांना मेसेज ट्रेसेबिलिटी लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत टेलिकॉम कंपन्यांना स्पॅम नंबर ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा तऱ्हेनं कंपन्या आपल्या सिम युजर्सपर्यंत मेसेज पोहोचण्याआधी स्पॅम लिस्टमध्ये मेसेज टाकून नंबर ब्लॉक करू शकतात.

१३ दिवस बँकांचं कामकाज नाही - नोव्हेंबर महिन्यात सण आणि सार्वजनिक सुट्ट्यांसोबतच विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बँकांचं कामकाज बंद राहणार आहे. नोव्हेंबर महिन्यात १३ दिवस बँकांना सुट्टी असेल. यामध्ये तुम्ही ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करून कामं पूर्ण करू शकता.

Mutual Fund चे नियम - बाजार नियामक सेबीनं म्युच्युअल फंडातील इनसाइडर ट्रेडिंगचे नियम कडक करण्याची तयारी केली असून तो नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेपासून लागू होणार आहे. म्युच्युअल फंड युनिट्ससाठी लागू करण्यात येणाऱ्या नव्या इनसाइडर नियमांनुसार आता अनुपालन अधिकाऱ्याला अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांच्या (एएमसी) फंडात नॉमिनी आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी केलेल्या १५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांची माहिती द्यावी लागणार आहे.