Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 08:29 AM2024-05-29T08:29:10+5:302024-05-29T08:57:22+5:30

Success Story : आयुष्यात यशाच्या उंचीवर पोहचायचं असेल तर प्रत्येक संकटाचा आणि संघर्षाचा सामना करावा लागतो. जे आज यशाच्या सर्वाच्च पातळीवर आहेत त्यांनीही त्यांच्या प्रवासात अनेक संघर्ष केले आहेत. या शेतकऱ्याच्या मुलानं मोठ्या मेहनतीनंतर आपलं २५ हजार कोटींचं साम्राज्य उभं केलंय.

आयुष्यात यशाच्या उंचीवर पोहचायचं असेल तर प्रत्येक संकटाचा आणि संघर्षाचा सामना करावा लागतो. जे आज यशाच्या सर्वाच्च पातळीवर आहेत त्यांनीही त्यांच्या प्रवासात अनेक संघर्ष केले आहेत. नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत, उद्योजक प्रत्येकाच्या यशामागे एक कहाणी असते.

रवी पिल्लई हे केरळमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांचं जीवन संघर्ष, यश आणि उल्लेखनीय कर्तृत्वानं भरलेलं आहे. पिल्लई यांचं बालपण अतिशय गरिबीत गेलं. त्यांचे वडील शेतकरी होते. पण, त्यांनी जिद्दीनं आणि मेहनतीनं आपलं नशीब बदलण्याचा निर्णय घेतला.

पिल्लई यांनी आरपी ग्रुपची स्थापना केली. हा आता अब्जावधी डॉलर्सचा समूह बनला आहे. हॉटेल्स, स्टील, गॅसपासून सिमेंट आणि शिपिंग मॉलपर्यंत त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे. त्यांच्या प्रवासाविषयी आज आपण जाणून घेऊ.

केरळमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अब्जाधीश रवी पिल्लई यांची कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे. गरिबीतून उठून ते एक प्रमुख उद्योगपती बनले. त्यांचा आरपी ग्रुपचे यशस्वी संस्थापक बनण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.

आरपी ग्रुप ही बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे. त्यांचे उत्पन्न ७.८ अब्ज डॉलर (६४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक) आहे. गेल्या काही वर्षांत पिल्लई यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करून लक्झरी हॉटेल्स, स्टील, गॅस, तेल, सिमेंट आणि शॉपिंग मॉल्सचा समावेश केला आहे. रवी पिल्लई हे १०० कोटी रुपयांचे एअरबस एच १४५ हेलिकॉप्टर घेणारे पहिले भारतीय आहेत.

केरळच्या कोल्लम मधील एका छोट्याशा गावात राहणारे रवी पिल्लई यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. रवी पिल्लई यांनी कोच्ची विद्यापीठातून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात व्यवसाय सुरू करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. १९७८ मध्ये ते सौदी अरेबियात गेले आणि त्यांनी १५० कर्मचाऱ्यांसह एक बांधकाम कंपनी स्थापन केली. आज त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ७० हजारांहून अधिक झाली आहे.

रवी पिल्लई अनेक पंचतारांकित हॉटेलही चालवतात. यामध्ये रविजा अष्टमुडी, रविजा कोवलम आणि रविजा कडवू यांचा समावेश आहे. पुण्यातील ट्रम्प टॉवरमधील लक्झरी कोंडोसह जगभरातील अनेक निवासस्थानांचा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश आहे. अनेक बँका आणि रिअल इस्टेट उपक्रमांमध्ये त्यांचा हिस्सा आहे. आरपी मॉलसह कोल्लममध्ये त्यांचे ३०० बेड्सचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलदेखील आहे.

आरपी ग्रुप मिडल ईस्टमधील भारतीय कामगारांच्या सर्वात मोठ्या नियोक्त्यांपैकी एक आहे. रवी पिल्लई यांना त्यांच्या योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००८ मध्ये त्यांना प्रवासी भारतीय सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. २०१० मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

याशिवाय न्यूयॉर्कच्या एक्सेल्सियर कॉलेजमधून त्यांनी डॉक्टरेटची पदवीही मिळवली आहे. २०१५ मध्ये त्यांच्या मुलीचं लग्न चर्चेत आलं होतं. केरळमधील हे सर्वात महागडे लग्न होतं. त्यासाठी ५५ कोटी रुपयांचा खर्च आला. ४२ देशांतील ३० हजारांहून अधिक पाहुणे या विवाहसोहळ्याला उपस्थित होते. सध्या रवी पिल्लई यांची एकूण संपत्ती सुमारे २५ हजार कोटी रुपये आहे.