गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 09:05 AM 2024-11-01T09:05:18+5:30 2024-11-01T09:45:20+5:30
Rules Change : दर महिन्याला काही नियम बदलतात. दरम्यान, दिवाळीदरम्यान १ नोव्हेंबरलाही अनेक नियम बदलले आहेत. याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणारे. Rules Change : दर महिन्याला काही नियम बदलतात. दरम्यान, दिवाळीदरम्यान १ नोव्हेंबरलाही अनेक नियम बदलले आहेत. एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. यामध्ये बँकिंगपासून अॅडव्हान्स ट्रेन तिकीट बुकिंग, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम, पेट्रोल-डिझेलपासून वीज बिल भरण्यापर्यंत अनेक नियम बदलत आहेत.
अशा वेळी लोकांनी या नियमांची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. एक छोटी चूक आणि तुम्हाला त्यामुळे मोठं नुकसानही होऊ शकतं. या सर्व बदलांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. जाणून घेऊयात कोणत्या नियमांमध्ये झालेत बदल.
LPG सिलिंडर - दर महिन्याप्रमाणे यंदाही एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल झाला आहे. इंधन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. याचा फटका छोट्या व्यवसायांना बसतो. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
UPI पेमेंटमध्ये बदल - १ नोव्हेंबर २०२४ पासून यूपीआय लाइट प्लॅटफॉर्ममध्ये दोन मोठे बदल होणार आहेत. यामुळे यूपीआय लाइट युझर्सना अधिक रकमेचं पेमेंट करता येईल. आरबीआयनं या व्यवहारांची मर्यादा ही वाढवली आहे. दुसऱ्या बदलानुसार तुमचा यूपीआय लाइट बॅलन्स एका ठराविक मर्यादेपेक्षा कमी असेल, तर नवीन ऑटो टॉप-अप फीचरमुळे यूपीआय लाइटमध्ये पुन्हा पैसे जोडले जातील. यामुळे मॅन्युअल टॉप-अपची गरज संपणार आहे. युनिफाइड पेमेंटइंटरफेस (यूपीआय) लाइटच्या मदतीनं त्वरित पेमेंट करता येतं.
मनी ट्रान्सफरचे नियम - देशांतर्गत मनी ट्रान्सफरसाठी नवीन नियम १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होतील, असं आरबीआयनं सांगितलं होतं. फसवणुकीसाठी बँकिंग चॅनेलचा गैरवापर रोखता यावा हा यामागील उद्देश होता. आरबीआयनं आपल्या परिपत्रकात म्हटलं होतं की, बँकिंग आउटलेट्सची उपलब्धता लक्षणीय वाढली आहे. केवायसीच्या गरजा पूर्ण करण्यात सुलभता आली आहे. आता युजर्सकडे मनी ट्रान्सफरसाठी अनेक डिजिटल पर्याय आहेत.
क्रेडिट कार्डाच्या नियमांत बदल - देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची उपकंपनी असलेल्या एसबीआय कार्ड्समध्ये १ नोव्हेंबरपासून मोठा बदल करण्यात आला आहे. क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिल पेमेंट आणि फायनान्स चार्जेसशी संबंधित हे नियम आहेत. १ नोव्हेंबरपासून अनसिक्युअर्ड एसबीआय क्रेडिट कार्डवर दरमहा ३.७५ रुपये फायनान्स चार्ज भरावा लागणार आहे. याशिवाय वीज, पाणी, एलपीजी गॅस आणि इतर युटिलिटी सर्व्हिसेसमध्ये ५०,००० रुपयांपेक्षा अधिक पेमेंट केल्यास १% अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.
रेल्वे तिकिटांमध्ये बदल - १ नोव्हेंबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता तुम्ही पूर्वीप्रमाणे १२० दिवस अगोदर नव्हे तर केवळ ६० दिवस अगोदर रेल्वे तिकीट बुक करू शकणार आहात. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग प्रक्रिया सोपी करण्यासाठी आगाऊ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये हे बदल केले आहेत.