Gautam Adani Hindenburg Impact : कोट्यवधींचं नुकसान; गौतम अदानींनी एका वर्षात जितके कमावले, तितके पाच दिवसांत गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 12:27 PM2023-02-02T12:27:25+5:302023-02-02T12:34:47+5:30

Gautam Adani Hindenburg Impact : मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. अदानींच्या संपत्तीत मोठी घसरण

Gautam Adani Hindenburg Impact : अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) गौतम अदानी (Gautam Adani) यांना मोठा झटका दिला आहे. अदानींनी गेल्या वर्षी 44 अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. परंतु गेल्या पाच दिवसांत त्यापेक्षा जास्त रक्कम त्यांनी गमावली आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, अदानींनी या वर्षात आतापर्यंत 48.5 बिलियन डॉलर्सची (सुमारे 39,61,72,49,25,000 रुपये) संपत्ती गमावली आहे. बुधवारी अदानी समूहाच्या सर्व दहा शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. यामुळे अदानींना एका दिवसात 12.5 अब्ज डॉलरचा फटका बसला आणि त्यांची एकूण संपत्ती 72.1 अब्ज इतकी झाली.

जगातील श्रीमंतांच्या यादीत अदानींची 13 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. याबरोबरच आशियातील श्रीमंतांच्या यादीतील त्यांचं वर्चस्वही तुर्तास संपलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्चचा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात अदानी समूह दशकांपासून शेअर्स आणि अकाऊंडमध्ये गडबड करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु अदानी समूहाकडून नंतर यावर स्पष्टीकरण देण्यात आलं. तसंच एफपीओपूर्वी त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

मात्र यामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. समूह कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 90 अब्ज डॉलर्सने घटले आहे. हा अहवाल येण्यापूर्वी अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. पण आता त्यांची 13 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यांच्या नेटवर्थमध्ये सर्वाधिक घसरण गेल्या एका आठवड्यात झाल्याचेही समोर आलेय.

मंगळवारी अदानी समूहाच्या दहा पैकी सात कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती. परंतु बुधवारी पुन्हा एकदा सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एन्टरप्राईजेसच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. तर अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली.

अदानी पोर्ट्स, अंबुजा सिमेंट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, एसीसी लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन, एनडीटीव्ही, अदानी विल्मर या अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्मध्येही मोठी घसरण दिसून आली.

अदानींच्या संपत्तीत झालेल्या घसरणीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. असं असलं तरी बुधवारी त्यांच्या संपत्तीत 49.1 कोटी डॉलर्सची घसरण झाली. ते 81 अब्ज डॉलर्ससह जगातील श्रीमंतांच्या यादीत 12 वे आणि आशियातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आले आहेत.

महत्त्वाचं म्हणजे जगातील पहिल्या 39 श्रीमंतांपैकी केवळ अदानी आणि अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये घसरण झाली आहे. अन्य श्रीमंतांच्या नेटवर्थमध्ये यावेळी तेजी आली आहे. गेल्या वर्षी अदानी सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती ठरले होते. तर यावर्षी त्यांनी सर्वाधिक नेटवर्थ गमावली आहे.

हिंडेनबर्गच्या आरोपांवर अदानी समूहाकडून 413 पानांचे उत्तर देण्यात आलं आहे. 'मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन' हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल वाचून आम्हाला धक्का बसला आहे आणि आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत. हा अहवाल खोटा आहे. हिंडनबर्गचे दस्तऐवज निवडक चुकीच्या माहितीचे एका वाईट हेतूनं केलेलं संयोजन आहे. यात एका विशिष्ट उद्देशाने समूहाला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आले आहेत, असंही अदानी समूहानं म्हटलंय.