संपूर्ण टेलिकॉम सेवांसाठी अदानींना मिळाला लायसन्स; Jio, Airtel ला टक्कर देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 10:19 AM2022-10-12T10:19:04+5:302022-10-12T10:23:39+5:30

अदानी डेटा (Adani Data) नेटवर्क्स लिमिटेडला (ADNL) सर्व सेवांसाठी युनिफाइड परवाना देण्यात आला आहे.

अदानी डेटा (Adani Data) नेटवर्क्स लिमिटेडला (ADNL) सर्व सेवांसाठी युनिफाइड परवाना देण्यात आला आहे. या परवान्याद्वारे कंपनी देशात सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा (Telecom Services) देऊ शकते. या घडामोडीशी परिचित असलेल्या सूत्रांनी अदानी समूहाच्या कंपनी ADNL ला एकात्मिक दूरसंचार परवाना मंजूर झाल्याची माहिती दिली.

सोप्या शब्दात सांगायचे तर, आता ते लांब पल्ल्याची कॉलिंग सेवा आणि त्यांच्या नेटवर्कवर इंटरनेट सेवा प्रदान करण्यास पात्र आहे. हा परवाना मिळाल्यानंतर, कंपनी भविष्यात तिच्या 5G सेवांचा विस्तार करू शकते. अदानींच्या प्रवेशामुळे व्होडाफोन-आयडिया व्यतिरिक्त जिओ, एअरटेल यांसारख्या कंपन्यांसमोर नवीन आव्हान असेल.

या संदर्भात अधिकृत सूत्राने सांगितले की, "अदानी डेटा नेटवर्क्सला UL (AS) परवाना मिळाला आहे." दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी परवाना जारी करण्यात आला. मात्र, या संदर्भात अदानी समूहाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

अदानी समूहाने नुकत्याच झालेल्या लिलावात स्पेक्ट्रम खरेदी करून देशातील दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. या स्पेक्ट्रमचा वापर समूहातील व्यावसायिक उपक्रमांसाठी करणार असल्याचे कंपनीने त्यावेळी सांगितले होते. ADNL ने नुकत्याच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात 400 MHz स्पेक्ट्रम 20 वर्षांसाठी 212 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

रिलायन्स जिओन 22 सर्कल्ससाठी 700 MHz चे स्पेक्ट्रम्स खरेदी केले आहे. याशिवाय स्पेक्ट्रम खरेदीत एअरटेलनंही चांगली बोली लावली आहे. एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी नेटवर्क यांनी मिळून एकून 62,095 कोटी रूपयांचे स्पेक्ट्रम्स खरेदी केली. या स्पेक्ट्रम लिलावातून सरकारला 1,50,173 कोटी रूपयांचा महसूल मिळाला होता.  

एअरटेल कंपनीने लिलावात 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गीगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीमध्ये 19867.8 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकत घेतले होते. तर दुसरीकडे रिलायन्स जिओनं सर्वाधिक स्पेक्ट्रम खरेदी केले असून त्यांनी 88,078 कोटी रूपयांची बोली लावली होती. सध्या देशात एअरटेल आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी काही ठराविक ठिकाणी 5G सेवांची सुरूवात केली आहे.