८७ टक्क्यांनी आपटून १४७ वर आला 'हा' शेअर; १० महिन्यांपूर्वी ११२५ रुपयांवर होता स्टॉक, तुम्ही तर गुंतवले नाही ना?

By जयदीप दाभोळकर | Updated: April 8, 2025 15:00 IST2025-04-08T14:51:29+5:302025-04-08T15:00:00+5:30

Gensol Share Price: एकेकाळी मल्टिबॅगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्यानं घसरण होत आहे. पाहूया कोणता आहे हा शेअर.

Gensol Share Price: शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊन मालामाल केलंय. पण असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी आधी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं होतं, परंतु आता त्यांचं मोठं नुकसान करतायत. एकेकाळी मल्टिबॅगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेनसोल इंजिनीअरिंगच्या शेअरमध्ये सातत्यानं घसरण होत आहे.

सोलार एनर्जीच्या व्यवसायात गुंतलेल्या या कंपनीचा शेअर मंगळवारी ५ टक्क्यांनी घसरून १४७.५५ रुपयांवर आला. सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्येही ५ टक्क्यांची घसरण झाली. जेनसोल इंजिनीअरिंगचे शेअर्स एका महिन्यात ५१ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. तर कंपनीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून ८७ टक्क्यांनी घसरलेत. जेनसोल इंजिनीअरिंगचा शेअर २४ जून २०२४ रोजी ११२५.७५ रुपयावर होता, जो ८ एप्रिल २०२५ रोजी १४७.५५ रुपयांवर आलाय.

जेनसोल इंजिनीअरिंगचा शेअर सहा महिन्यांत ८१.६५ टक्क्यांनी घसरला आहे. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ८०४.२० रुपयांवर होता. सोलार एनर्जी व्यवसायाशी संबंधित कंपनीचे शेअर्स ८ एप्रिल २०२५ रोजी १४७.५५ रुपयांवर पोहोचले.

या वर्षी आतापर्यंत कंपनीचे शेअर्स ८१ टक्क्यांनी घसरले आहेत. तर जेनसोल इंजिनीअरिंगचे शेअर्स गेल्या दोन महिन्यांत ८० टक्क्यांनी घसरले आहेत. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर ७३६.१० रुपयांवर होता, जो ८ एप्रिल २०२५ रोजी १४७.५५ रुपयांवर पोहोचला. जेनसोल इंजिनीअरिंगच्या शेअर्सनं २१ फेब्रुवारी २०२५ पासून २९ ट्रेडिंग सेशनमध्ये केवळ दोन सत्रांमध्ये उसळी घेतली आहे.

१९ मार्च रोजी कंपनीच्या शेअर्सना ५ टक्क्यांचं अपर सर्किटवर लागलं होतं. तर ३ एप्रिल रोजी जेनसोल इंजिनीअरिंगच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांची वाढ दिसून आली. गेल्या काही वर्षांत कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना दोनवेळा बोनस शेअर्स दिलेत. जेनसोल इंजिनीअरिंगन ऑक्टोबर २०२३ मध्ये आपल्या भागधारकांना १:२ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक १ शेअरमागे २ बोनस शेअर्सचं वाटप केलं. यापूर्वी कंपनीनं ऑक्टोबर २०२१ मध्ये गुंतवणूकदारांना ३:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते.

(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)