अनावश्यक कॉलपासून होणार सुटका, फेक टेलिकॉलर्सवर TRAI ची ॲक्शन By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 03:47 PM 2023-02-16T15:47:02+5:30 2023-02-16T15:54:44+5:30
ट्रायनं दूरसंचार कंपन्यांना स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिलेत. पाहा काय म्हटलंय ट्रायनं. TRAI Guidelines : दूरसंचार नियामक TRAI ने दूरसंचार कंपन्यांना अनावश्यक कॉल आणि एसएमएस थांबवण्यासाठी नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटरवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रायनं कंपन्यांना खाजगी नंबरवरून कॉल करणाऱ्या टेलिमार्केटरवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, दर तीनपैकी दोन भारतीयांना दररोज तीन किंवा त्याहून अधिक त्रासदायक कॉल येत असल्याचं म्हटलं. तसेच त्यापैकी ५० टक्के लोकांनी असे कॉल लोकांच्या वैयक्तिक नंबरवरून येत असल्याचंही सांगितलं.
दरम्यान, नोंदणीकृत टेलीमार्केटिंग टेम्प्लेटचा वापर सुनिश्चित करण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटरना ब्लॉक करण्यास सांगितलं आहे. सूचनांचं उल्लंघन करणाऱ्या टेलिमार्केटरवर कडक कारवाई करण्यासही सांगण्यात आलं आहे. ट्रायने सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांना पावलं उचलण्यास सांगण्यात आलं आहे.
ट्रायच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, टेलीमार्केटिंगमधील अशा सर्व नोंदणीकृत कंपन्यांना दर २० ते ६० दिवसांनी पुन्हा पडताळणी करण्यास सांगितलं आहे. तसंच मिळते जुळते संदेश थांबविण्याचे प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दूरसंचार कंपन्यांना हे सुनिश्चित करावं लागेल की निर्धारित वेळेत संदेश काढून टाकले जातील. याशिवाय, कोणत्याही परिस्थितीत १० अंकी क्रमांकावरून टेलीमार्केटिंग मेसेज पाठवले जाऊ नयेत याची खात्री करण्याची जबाबदारीही दूरसंचार कंपन्यांची आहे. सर्व दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांना ही मार्गदर्शक तत्त्वे ३० दिवसांत अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आलं आहे.
ट्रायने मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या टेलिमार्केटर्सवर नियमानुसार कारवाई करण्यास सांगितलं आहे. यासोबतच योग्य त्या कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सेवा प्रदाता कंपनी अशा टेलिमार्केटरचे सर्व तपशील इतर सेवा प्रदात्यांसह शेअर करेल.
सर्वजण त्यांच्या नेटवर्कवर अशा टेलिमार्केटिंग कंपन्यांना कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि कमर्शिअल कम्युनिकेशन पाठविण्यास बंदी घालतील. ट्राय या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे दिशाभूल करणाऱ्या शीर्षकांसह जाहिरातींवर बंदी घालू इच्छित आहे.