₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 12:18 PM2024-09-29T12:18:00+5:302024-09-29T12:23:56+5:30

...अर्थात देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा दर 110000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ बघायला मिळत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदर कपातीमुळे सोन्याचे दर वाढल्याचे मानले जात आहे. आगामी काळात व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील वाढलेल्या तणावाचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे. एवढेच नाही तर, जगभरातील केंद्रीय बँकांकडून सातत्याने सोन्याची खरेदी केली जात आहे. हेदेखील सोन्याच्या दरातील तेजीमागचे एक मोठे कारण आहे.

महत्वाचे म्हणजे, सोन्याच्या बाजारावर लक्ष असणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किंतीत आणखी वाढ बघायला मिळू शकते. काही तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काही वर्षांत सोन्याचा दर एक लाख रुपयांच्याची पुडे जाऊ शकतो.

यूएस फेड रिझर्व्हच्या निर्णयाचाही परिणाम - याच महिन्यात, फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 50 बेसिस पॉइंटने कपात केली आहे. फेडरल रिझर्व्हने गेल्या 4 वर्षांत प्रथमच व्याजदरात कपात केली. या कपातीनंतर व्याजदर 4.75 ते 5 टक्क्यांच्या दरम्यान आला आहे.

डॉलर कमजोर झाल्याचा फायदा सोन्याला होत आहे. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा जेव्हा डॉलर कमजोर होईल तेव्हा सोन्याच्या किमतीत वाढ नक्कीच दिसून येईल.

या वर्षात 30% ने वाढला भाव - 26 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 2685.42 डॉलर प्रति औंस एवढा होता. तर, देशांतर्गत बाजारात मुंबईमध्ये एमसीएक्सवर सोन्याचा दर 75,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. या वर्षात आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, कोटक सिक्योरिटीजशी संबंधित अनिंदय बॅनर्जी यांच्या मते सोन्याचा दर पुढील 4 वर्षांत 4000 डॉलर प्रति औसपर्यंत पोहोचू शकतो. अर्थात देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा दर 110000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.