सोन्या, चांदीकडे पाहता पाहता, हिऱ्याकडे दुर्लक्ष झाले; प्रति कॅरेट दर चार पटींनी गडगडले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 02:11 PM2024-07-29T14:11:02+5:302024-07-29T14:18:20+5:30

Diamonds Price: हिरा हा तुलनेने महागडा असल्याने हिऱ्याचा दागिना घेण्याची अनेकांची इच्छा अधुरीच ठेवावी लागली आहे. परंतू, अशी वेळ आली आहे की ही इच्छा देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर सोन्या चांदीच्या दरांनी जी घसरण सुरु केली ती काही केल्या थांबत नाहीय. एकाच दिवसात सोन्या चांदीने लोकांचे १०.५ लाख कोटी रुपये बुडविले होते. या सोन्या चांदीने आतापर्यंतचा सर्वाधिक दर गाठला होता. तसे पाहता सोने चांदी हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय. परंतू, हिरा हा तुलनेने महागडा असल्याने हिऱ्याचा दागिना घेण्याची अनेकांची इच्छा अधुरीच ठेवावी लागली आहे. परंतू, अशी वेळ आली आहे की ही इच्छा देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हिऱ्याच्या किंमतीत गेल्या दोन वर्षांपासून सतत घसरण सुरु आहे. या बहुमुल्य हिऱ्याने लोकांचा मोहभंग केल्याचे बोलले जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार हिरा आता महागडा राहिलेला नसून एक ग्रॅम सोन्याच्या किंमतीपेक्षाही स्वस्त त्याचा एक कॅरेट झाला आहे.

मागील दोन वर्षांत लॅबमध्ये निर्माण केलेल्या हिऱ्याची किंमत चार पटींनी कोसळली आहे. एवढेच नव्हे कर नैसर्गिक हिऱ्याची किंमतही कोसळली आहे. जुलै २०२२ मध्ये हिऱ्याचा खर्च प्रति कॅरेटमागे ३५ हजार रुपये होता. तो यंदाच्या जुलैमध्ये 6529 रुपये झाला आहे.

दुसरीकडे नैसर्गिक हिऱ्याच्या किंमतीतही गेल्या दोन वर्षांत २५ ते ३० टक्क्यांची घसरण झाली आहे. हिऱ्याची निर्यात घटली असून देशातही मागणी घटली आहे. यामुळे हिऱ्यांच्या किंमती गडगडल्या आहेत. हिरे व्यापाऱ्यांनुसार बाजार एवढा कोसळला आहे की व्यवसाय करणे कठीण होऊन बसले आहे. नुकसान वाढत चालल्याने मागणी देखील पूर्ण करता येत नाहीय. यामुळे डायमंड इंडस्ट्री आणि कामगारांवर याचा परिणाम दिसू लागला आहे.

अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांमध्ये मंदीचे वारे आणि चीनने फिरविलेली पाठ यामुळे हिरे व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. भारतात फेब्रुवारीत मोठ्या प्रमाणावर कच्च्या हिऱ्यांची आयात करण्यात आली आहे. यामुळे दरात सुधारणा होईल असे व्यापाऱ्यांना वाटले होते. परंतू त्यांच्या या आशेवर पाणी फिरले आहे. भारतात आता हिऱ्यांचा साठा अधिक असून नैसर्गिक हिरे हे दोषयुक्त आहेत. त्यांना लॅबमध्ये बनविलेल्या हिऱ्यांसोबत मोठी स्पर्धा करावी लागत आहे.

चीन या नैसर्गिक हिऱ्यांचा मोठा खरेदीदार होता. अचानक चीनने मागणी थांबविली आणि हिरे व्यापारी अडचणीत आले. चीनने एकूण मागणीच्या १०-१५ टक्केच मागणी केली आहे. चीनही आर्थिक संकटातून जात आहे. कोरोनानंतर बहुतांश लोक विलासी आयुष्यापासून दूर होत चालले आहेत.

व्यापाऱ्यांचे आता पैसे यात अडकू लागले आहेत. त्यांनी जास्त किंमतीने हे हिरे खरेदी केले आहेत, परंतू आता त्यांना कमी किंमतीत हे हिरे विकावे लागत आहेत. यामुळे त्यांने नुकसान वाढत चालले असून याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरही होताना दिसत आहे.