अरे व्वा! सोनं-चांदी पुन्हा झालं स्वस्त, झटपट जाणून घ्या १० ग्रॅमचा लेटेस्ट दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 06:18 PM2021-05-25T18:18:57+5:302021-05-25T18:22:38+5:30

सोनं आणि चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती. सोन्यानं सर्वोच्च पातळी गाठली होती. लवकरच सोनं पुन्हा एकदा ५० हजारांचा आकडाही पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु मंगळवारी सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली.

आज सोन्याचा भाव १२८ रुपयांनी घसरून ४८,४२५ रुपये (Gold Rate Today) च्या पातळीवर पोहोचला आहे. तर सकाळी ११ च्या सुमारास तो १११ रुपयांनी घसरून ४८,४४२ रुपयांवर होता. मागील सत्रात सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ४८,५५३ रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता.

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही आज घसरण दिसून आली. जुलैच्या रेटसाठी चांदी ४७० रुपयांनी घसरून ७१ हजार ३४१ रुपये प्रतिकिलोवर व्यापार करत होती. आता चांदीच्या दरात २६९ रुपयांनी घसरून ७० हजार ८१० रुपये प्रति किलो झाली आहे.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, वाढती महागाई, कर्जावरील आर्थिक वाढ, मध्य पूर्वमधील तणाव, अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध अशा कारणांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात जागतिक बाजारपेठेत घट झाल्याचं सांगण्यात येत आहे.

आगामी काळात मात्र सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सोन्यात गुंतवणूक करण्याचा मार्ग चांगला असल्याचं सांगितलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी सरकारनं १ जूनपासून देशात हॉलमार्किंग (Hallmarking) अनिवार्य करण्याचे निर्देश दिले होते. परंतु आता हॉलमार्किंगसाठी देखील तारीख बदलण्यात आली आहे.

आता १५ जूनपासून सोन्यावर हॉलमार्किंग करणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच अर्थ १५ जूनपासून सर्व ज्वेलर्स हॉलमार्किंग असलेलंच सोनं विकू शकतील.