Gold Investment Tips: दागिने घ्यावेत की डिजिटल गोल्ड? आता सोनारही विकू लागलेत, तुमचा फायदा कशात? एकदा पहाच... By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 11:08 AM 2022-12-14T11:08:05+5:30 2022-12-14T11:14:17+5:30
Buy Jewelery or Digital Gold Tips in Marathi: मंदी असो, सोन्याचे दर चढलेले असो, अनेक जण थोडे का होईना, पण सोन्याच्या खरेदीला पसंती देतात. कारण सोने हा आपल्याकडे केवळ ‘दागिना’ किवा हौस नाही... पण व्यावहारिक विचार केला का? सण-उत्सवांचा काळ जवळ आला की आपल्याकडे सोने खरेदीला उधाण येतं. मंदी असो,सोन्याचे दर चढलेले असो, अनेक जण थोडे का होईना,पण सोन्याच्या खरेदीला पसंती देतात. कारण सोने हा आपल्याकडे केवळ ‘दागिना’ किवा हौस नाही, तर संस्कृती आणि भावनाही त्याच्याशी जोडलेल्या आहेत.
अनेक कुटुंबाचा तर परंपरेनुसार आपला ‘सोनार’ही नक्की केलेला असतो. पिढ्यानपिढ्या ते याच सोनाराकडून सोनं-चांदी खरेदी करतात. पण अलीकडच्या काळात तुमच्या याच सोनारानं तुम्हाला प्रत्यक्ष सोनं विकण्यापेक्षा आमच्याकडून ‘डिजिटल सोनं’ घ्या, म्हणून तुम्हाला लिंक पाठवली तर आश्चर्य वाटून घेऊ नका !
कारण अनेक सोनार आता प्रत्यक्ष सोन्यासोबतच डिजिटल सोनंही विकायला लागले आहेत. पण हे सगळं पाहून अनेकांच्या मनात नक्कीच शंका आली असेल की खरंच कोणतं सोनं विकत घ्यावं? हातात घेऊन पाहता येईल, आपल्या घरात ठेवून प्रसंगी अंगावर मिरवता येईल असं सोनं की ज्याचा प्रत्यक्ष स्पर्श अनुभवता येणार नाही, असं डिजिटल सोनं?..
आपल्याला समोर दिसणारं प्रत्यक्ष सोनं, ते अंगावर मिरवताना अतीव आनंद देणारा त्याचा फिल,याची तुलना कशातही करता येणारी नसली,तरी डिजिटल सोन्याची अनेक वैशिष्ट्ये ही आहेत.
१- मुख्य म्हणजे हे सोने निर्धोक,सुरक्षित आहे. हे सोने ठेवण्यासाठी तुम्हाला ना बँक लॉकरची गरज,ना तिजोरीची.
२- हे सोने कुठे ठेवायचे आणि ते चोरीला जाणार नाही, याची काळजी कशी घ्यायची,याची चिंता तुम्हाला नाही.
३- प्रत्यक्ष सोन्यात भेसळ असण्याचा धोका असू शकतो, डिजिटल सोने मात्र तुम्हाला ‘सर्टिफाईड २४ कॅरट’ मिळतं.
४- प्रत्यक्ष सोनं किवा दागिने खरेदी करताना तुम्हाला घडणावळ द्यावी लागते, डिजिटल सोन्याच्या बाबतीत मात्र जीएसटी व्यतिरिक्त इतर कुठलेही छुपे दर नाहीत.
५- डिजिटल सोनं संपूर्ण भारत भरात तुम्हाला त्या दिवशी जो दर आहे, त्याच दरानं मिळतं, प्रत्यक्ष सोन्याच्या बाबतीत मात्र दरांमध्ये बऱ्याचदा बदल दिसून येतो.
६- सोनं विकायचं असतानाही त्यात पूर्णत: पारदर्शकता असते. तुमच्या सोन्यात कोणतीही घट धरली न जाता, हे सोनं तुम्हाला विकता येतं.
७- शिवाय डिजिटल सोनं तुम्हाला कितीही छोट्या स्वरुपात विकत घेता येतं, प्रत्यक्ष सोन्यात ही सोय नाही.