Gold Price Today: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचा दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 02:45 PM2021-09-10T14:45:14+5:302021-09-10T14:49:43+5:30

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कारण सोन्याच्या दरात घसरण कायम असून आजही सोन्याचा दर कमी झाला आहे.

गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर बाजारपेठेत सोनं आणि चांदीच्या भावात घसरण नोंदविण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या भावात ०.१४ टक्क्यांनी घसरण झाली. त्यामुळे सोनं ४६,७९३ रुपये प्रतितोळा या पातळीवर येऊन पोहोचले आहे.

सोन्याच्या दरात अशीच घसरण कायम राहिल्यास आगामी काळात सोन्याचा दर ४३ हजारांपर्यंत खाली उतरेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा दर प्रतितोळा दर ४७,४५१ रुपये इतका होता. तो आता आठवड्याच्या शेवटापर्यंत ४६,७९३ रुपयांच्या पातळीवर आला आहे. त्यामुळे आठवडाभरात सोनं जवळपास ५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे.

चांदीच्या दरातही घसरणीची नोंद झाली आहे. आज चांदीच्या दरात ०.०५ टक्क्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे चांदीचा भाव प्रतिकिलो ६४ हजार १५० रुपये इतका झाला आहे. याआधी सोमवारी दर ६५ हजार २६१ रुपये इतका होता.

आंतरराष्ट्रीय बाजारतही सोन्याच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळत आहे. बाजारातील किंमत प्रति औंस १८०० डॉलरच्या खाली गेली आहे.

सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच गोल्ड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं देखील फायदेशीर ठरणारं आहे. दरमहा १ हजार रुपये एसआयपीच्या माध्यमातून गोल्ड म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला तुम्ही सुरुवात करू शकता.

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करु लागले आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे.

सोने व्यापाऱ्यांना १० लाखापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांचे तपशील ठेवणे बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.