Gold Price Today : दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढ, चांदीही महागली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 12:11 PM2021-10-20T12:11:29+5:302021-10-20T12:26:27+5:30

Gold Price Today : बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात (Gold and Silver Price Today) वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात तुमचा सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी सोने खरेदी करणे महाग झाले आहे. बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात (Gold and Silver Price Today) वाढ झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर प्रति तोळा सोन्याची किंमत (Gold price today) 93 रुपयांनी म्हणजेच 0.20 टक्के वाढली आहे. या वाढीनंतर आज सोने प्रति तोळा 47,355 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी (silver price today) आज किरकोळ वाढीसह 64,432 रुपयांवर व्यवहार करत आहे.

तज्ज्ञांच्या मते, दिवाळी ते डिसेंबर पर्यंत सोन्याची किंमत 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांना असे वाटते की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 47,510 रुपयांवर आहे, कालच्या व्यापार किमतीपेक्षा आज दर 560 रुपयांनी कमी झाला आहे. दरम्यान चांदी कालच्या व्यापार किमतीपेक्षा 600 रुपयांच्या वाढीसह 64,200 रुपये प्रति किलोवर होती. नवी दिल्ली आणि मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा अनुक्रमे 46,450 आणि 46,510 रुपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, चेन्नईमध्ये सोन्याचा दर 44,650 रु. प्रति तोळा आहे. नवी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,670 रुपये प्रति तोळा आहे. चेन्नईमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचा दर 48,710 रुपयांवर आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 47,510 रुपये आहे, तर कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 49,550 रुपये आहे.

तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.

या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.