Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, रुपया झाला मजबूत; जाणून घ्या ताजा दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 06:17 PM2021-08-06T18:17:15+5:302021-08-06T18:22:30+5:30

Gold Rate 6th Augest 2021: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं आणि चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. जाणून घ्या ताजा दर काय?

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं आणि चांदीच्या किमतीवर दबाव दिसून आला आहे. आज दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं २८३ रुपयांच्या घसरणीसह ४६ हजार ५७० रुपयांवर पोहोचलं आहे.

गेल्या सत्रात सोन्याचा हाच दर ४६ हजार ८५३ रुपये इतका होता. या आठवड्यात लागोपाठ पाचव्या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारलेला पाहायला मिळाला. आज रुपयाचा डॉलरच्या तुलनेतील भाव २ पैशांच्या वाढीसह ७४.१५ इतका नोंदवला गेला.

सराफा बाजारात आज चांदीच्या दरातही ६६१ रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदीचा सध्याचा दर प्रतिकिलो ६५ हजार ५१४ रुपये इतका नोंदवला गेला आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घट नोंदवली गेली आहे. ताज्या दरानुसार सोन्याच्या किमतीत १०.३५ डॉलरच्या घटीसह १७९८.५५ डॉलर प्रतिऔंस स्तरावर बंद झाला आहे.

एमसीएक्सवर दुपारी पाच वाजता ऑक्टोबरसाठीच्या सोन्याचा दर १६६ रुपयांच्या घटीसह ४७ हजार ४३७ रुपयांवर ट्रेंड करत होता. तर डिसेंबरसाठीचा दर १८५ रुपयांच्या घटीसह ४७ हजार ६२३ रुपयांवर ट्रेंड करत होता.

एमसीएक्सवर चांदीच्या दरातही घट झाल्याचं पाहायला मिळालं. सप्टेंबरसाठीचा चांदीचा दर ४०३ रुपयांच्या घटीसह प्रतिकिलो ६६ हजार ५९५ रुपयांवर ट्रेंड करत होता.

दरम्यान सलग पाचव्या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याचं पाहायला मिळालं. रिझर्व्ह बँकेनं आज पतधोरण जाहीर करताना सलग सातव्यांदा व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट ४ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाला मजबूती मिळाली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर आज ७४.१५ वर बंद झाला आहे.