या महिन्यात १६३३ रुपयांनी महागले सोने, धनत्रयोदशीला असेल एवढा भाव By बाळकृष्ण परब | Published: November 8, 2020 01:05 PM 2020-11-08T13:05:02+5:30 2020-11-08T13:13:57+5:30
Gold-Silver Price News : काही दिवसांच्या घसरणीनंतर या महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या दरात प्रति तोळा सुमारे १६३३ रुपयांची वाढ झाली आहे. धनत्रयोदशीपूर्वी सोन्याचे भाव वाढू लागले आहेत. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत सोन्याचे भाव १६३३ रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीच्या दरांमध्येसुद्धा तेजी दिसून येत आहे. चांदीचे भाव प्रति किलो ५ हजार ९१९ रुपयांनी वाढले आहेत. मात्र या वाढीनंतरही सोन्याचे भाव ७ ऑगस्टच्या उच्चांकी भावापासून ३ हजार ६३ रुपयांनी कमी आहेत. तर चांदीसुद्धा आपल्या सर्वोच्च स्तराहून ९ हजार १६८ रुपयांनी स्वस्त आहे.
माहीतगारांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेमध्ये नव्या राष्ट्रपतीची निवड होण्याबरोबरच आर्थिक प्रोत्साहन पॅकेजच्या घोषणेच्या अपेक्षेमुळे सोन्याचे दर वाढले आहेत. देशांतर्गत बाजारच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या भावांमध्ये तेजी दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १९५० डॉलर प्रति औंस एवढा आहे. तर चांदीचा भावसुद्धा २५.४४ डॉलरच्या आसपास आहे.
केडिया अॅडव्हायझरीचे डायरेक्टर अजय केडिया यांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव ५२ हजार ते ५४ हजारांच्या दरम्यान, राहू शकतात. तसेच बायडेन यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शेअर बाजारावरील दबाव वाढेल.
सोन्याचे भाव वाढण्यासाठी हे घटक कारणीभूत कोरोनाचे वाढते रुग्ण आणि अनिश्चितता सोन्याचे भाव वाढण्याचे कारण ठरू शकतात. अशा परिस्थितीत केंद्रीय बँका भविष्य विचारात घेऊन अधिकाधिक सोने खरेदी करत आहे. दुसरीकडे अमेरिका आणि चीनमधील व्यापारामधील तणाव, भारत आणि चीनमधील तणावाचे वातावरण अनिश्चिततेमध्ये वाढ करत आहे. तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने २०२३ पर्यंत व्याजदर शून्य टक्क्यांच्या आसपास राहण्याचे संकेत दिले आहेत.
या वातावणात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का? सध्या गुंतवणुकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी करावी. अल्पकालीन लाभासाठी गुंतवणूक करू नये. कारण गेल्या १५ वर्षांमध्ये सोने सुमारे सात हजार रुपये प्रति दहा ग्रॅम दराने वाढत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणुकदारांनी आपल्या सोन्याच्या पोर्टफोलिओमध्ये ५-१० टक्क्यांदरम्या गुंतवणूक करावी. तसेच दिवाळीबरोबरच गुंतवणुकदारांना मासिक आणि त्रैमासिक आधारावर वेळोवेळी सोन्यामध्ये गुंतवणूक करत राहिली पाहिजे. मात्र सोन्यामध्ये एकरकमी गुंतवणूक करणे टाळले पाहिजे.