Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, तुटू शकतात जुने विक्रम! जाणून घ्या लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 02:41 PM2022-08-02T14:41:06+5:302022-08-02T14:54:27+5:30

सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. यापूर्वी सोन्याच्या दराने महिनाभरातील उच्चांक गाठला होता.

आज जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. या घसरणीसह चांदीचा भाव 58 हजारांच्या खाली आला आहे. तर, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. यापूर्वी सोन्याच्या दराने महिनाभरातील उच्चांक गाठला होता.

जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर - मल्टीकमोडिटी एक्सचेन्जवर (MCX) आज सकाळच्या सुमारास 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 75 रुपयांनी घसरून 51,351 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आला आहे. तर चांदीचा दर 395 रुपयांनी घसरून 57,931 रुपये प्रति किलोवर आला आहे.

यापूर्वी, 51,250 रुपयांच्या पातळीवर सोन्याच्या ट्रेडिंगची सुरुवात झाली होती. तर चांदीच्या ट्रेडिंगची सुरुवात 58,261 रुपयांवरून झाली होती. सध्या सोने आपल्या मागील बंद भावाच्या तुलनेत 0.15 टक्क्यांनी घसरले आहे. तर चांदी गेल्या बंद भावाच्या तुलनेत 0.68 टक्के खालच्या पातळीवर ट्रेडिंग करत आहे.

ग्‍लोबल मार्केटमध्येही चढ-उतार- गेल्या काही सत्रांत ग्‍लोबल मार्केटमध्येही सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ-उतार बघायला मिळत आहे. अमेरिकेतील बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1,774.04 डॉलर प्रती औंस एवढी आहे. तर, चांदीच्या स्पॉट किंमतीत घसरण दिसून येत असून ती 20.2 डॉलर प्रती औंसवर आहे.

काय म्हणतायत एक्सपर्ट्स? सध्या सोन्याची किंमत कमी होत असली तरी, महागाई आणि मंदीचा धोका काही प्रमाणात कमी होताच सोन्याच्या दरात पुन्हा तेजी एईल, असे तज्ज्ञांचे म्हणने आहे. तज्ज्ञांच्या मते, या वर्षाच्या अखेरपर्यंत सोने 54 हजारांवर पोहोचू शकते.

कसा ठरतो सोन्याचा दर? - खरे तर सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती.

त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.

लंडनमध्ये ठरवला जातो सोन्याचा दर - आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना, अशी त्यांची नावे आहेत.

सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री, असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो. सोने आपल्या बँका परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागतात आणि डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते.