LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 08:42 AM2024-06-01T08:42:31+5:302024-06-01T08:54:39+5:30

LPG Price Cut: देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी लागणार आहेत. पण निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात आता कपात करण्यात आलीये.

LPG Price Cut: देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदान (Loksabha Election Voting) होत असून ४ जून रोजी निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. पण निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे.

देशात एलपीजी सिलिंडरच्या दरात १ जून २०२४ पासून कपात (LPG Cylinder Price Cut) करण्यात आली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. आयओसीएलच्या वेबसाईटनुसार, १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला आहे. जाणून घेऊया दिल्ली ते मुंबई चे नवे दर...

एलपीजी सिलिंडरचे नवे दर १ जून २०१४ पासून लागू करण्यात आले आहेत. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी यंदाही १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू होण्यापूर्वी कंपन्यांनी एलपीजी ग्राहकांना मोठी भेट दिली आहे.

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी केलेल्या ताज्या बदलांनंतर १ जूनपासून दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर ६९.५० रुपये, कोलकातामध्ये ७२ रुपये, मुंबईत ६९.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ७०.५० रुपये स्वस्त झाला आहे.

सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. याआधी एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीलाच दिलासा देणारी बातमी आली आणि ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात २० रुपयांपर्यंत कपात केली.

नवीन सिलिंडरचे दर आयओसीएलच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आले आहेत, जे १ जून २०२४ पासून लागू करण्यात आलेत. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर (Delhi LPG Price) आता १७४५.५० रुपयांवरून १६७६ रुपयांवर येणार आहे. याशिवाय कोलकात्यात १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १८५९ रुपयांऐवजी १७८७ रुपयांना मिळणार आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १६९८.५० रुपयांना विकला जात होता, जो आता १६२९ रुपये झाला आहे. तर चेन्नईत १९११ रुपयांना विकल्या जाणाऱ्या सिलिंडरची किंमत १८४०.५० रुपयांवर आली आहे.

विशेष म्हणजे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक वापरासाठी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. अशा तऱ्हेनं त्याची किंमत कमी झाल्यानं बाहेरचं खाणं-पिणं स्वस्त होऊ शकतं. दुसरीकडे, घरांच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आयओसीएलच्या वेबसाईटनुसार त्यांच्या किमती कायम ठेवण्यात आल्यात.

दिल्लीत याची किंमत ८०३ रुपये आणि उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी ६०३ रुपये आहे. घरगुती सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपये आहे. महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने मोठा दिलासा देत १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या (Domestic LPG Cylinder) किंमतीत १०० रुपयांनी कपात करण्याची भेट दिली होती.