खुशखबर! फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर आणखी वाढणार; ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 10:24 AM2023-02-08T10:24:49+5:302023-02-08T10:37:08+5:30

विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना आकर्षित करण्यासाठी काही प्रमुख बँकांनी दीर्घ मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिटसाठी ७.५५ टक्के ते ८ टक्क्यांपर्यंत व्याजदर देण्याची घोषणा केली आहे.

नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पोस्टाच्या मासिक योजना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या बचत योजनांमधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकांनीदेखील मुदत ठेवींवरील (फिक्स्ड डिपॉझिट) व्याज वाढविण्यास सुरुवात केल्याचे दिसते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना आकर्षित करण्यासाठी काही प्रमुख बँकांनी दीर्घ मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिटसाठी ७.५५ टक्के ते ८ टक्क्यांपर्यंत व्याजदर देण्याची घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे, बुधवारी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे द्वैमासिक पतधोरण मांडले जाणार आहे. यामध्ये रेपो दरामध्ये आणखी ०.२५ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही दरवाढीची घोषणा झाली तर ज्याप्रमाणे कर्जावरील व्याजदरात वाढ होईल तशीच वाढ फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात देखील होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्याजदरात वाढ - - गेल्या मे महिन्यापासून डिसेंबर २०२२ पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात सात वेळा वाढ केली. मे ते डिसेंबर अशा आठ महिन्यांत व्याजदरामध्ये २.२५ टक्क्यांनी वाढ झाली.

- व्याजदरात झालेली ही सर्व वाढ बँकांनी कर्जदार ग्राहकांवर लादत त्याद्वारे नवीन व्याज आकारणी सुरू केली. मात्र, पहिल्या दोन दरवाढीनंतर फिक्स्ड डिपॉझिटच्या दरात मात्र वाढ झाली नव्हती.

- तिसऱ्या दरवाढीनंतर फिक्स्ड डिपॉझिट ग्राहकांच्या व्याजदरातदेखील बँकांनी वाढ करण्यास सुरुवात केली. सरत्या सहा महिन्यांत फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात ०.६० टक्के वाढ झाली आहे.

- मात्र, केंद्रीय अर्थसंकल्पात बचत योजना आणि ज्येष्ठ नागरिक योजनांच्या मर्यादेत वाढ केल्यानंतर तसेच कर प्रणालीत केलेल्या बदलानंतर लोकांच्या हाती काही प्रमाणात अधिक पैसा खेळता राहील, हा आडाखा बांधत या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकांनी फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे.

- बँकांनी केवळ व्याजदरातच वाढ केलेली नाही, तर गुंतवणुकीच्या मर्यादेत देखील वाढ केली आहे. २ कोटी रुपयांपर्यंतच्या दीर्घकालीन मुदत ठेवींसाठी ज्येष्ठ नागरिकांना ७.५५ ते ८ टक्क्यांपर्यंत व्याज देण्याची घोषणा केली आहे.