नको असलेल्या कॉल्स, एसएमएसपासून होणार सुटका; प्रत्येक कॉलसाठी १० हजारांपर्यंतचा होणार दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 01:56 PM2021-07-07T13:56:51+5:302021-07-07T14:05:50+5:30

Unwanted Mobile Calls and SMS : तुम्हाला नको असलेल्या कॉलपासून मिळणार सुटका. दूरसंचार विभागाकडून कठोर निर्बंधांसह दंडाची तरतूद.

नको असलेल्या कॉल्सपासून तुमची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. दूरसंचार विभागानं सातत्यानं नको असलेले येणारे कॉल्स आणि एसएमएसवर कठोर कारवाई करत दंडाची तरतूद केली आहे. दूरसंचार विभागाशी निगडीत वरिष्ठ अधिकाऱ्यानं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

दूरसंचार विभागानं केलेल्या तरतुदीनुसार ५० वेळा उल्लंघन केल्यानंतर पुन्हा उल्लंघन केल्यास प्रत्येक कॉल आणि एसएमएससाठी १० हजार रूपयांचा दंड आकारला जाणार आहे.

नव्या तरतुदींनुसार शून्य ते १० उल्लंघनांपर्यंत प्रति उल्लंघन १ हजार रूपये, १० ते ५० उल्लंघांपर्यंत प्रति उल्लंघन ५ हजार रूपये आणि ५० पेक्षा अधिक वेळा उल्लंघन केल्यास प्रति उल्लंघन १० हजार रूपयांचा दंड आकारला जाणार आहे.

आतापर्यंत नियमावलीप्रमाणे (TCCPR) २०१८ अंतर्गत दंडाचे स्लॅब शून्य ते १००, १०० ते १००० आणि १००० उल्लंघन असे ठेवण्यात आले आहे.

याशिवाय आता दूरसंचार डीओटीचा एकभाग DIU हा उपकरणांच्या स्तरावर उल्लंघनांची तपासणी करणार आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिव्हेरिफिकेशनच्या स्थितीत सर्व क्रमांक डिस्कनेक्ट करण्यात येतील आणि त्यांच्याशी निगडीत आयएमईआय क्रमांकांना संशयित यादीत समाविष्ट करण्यात येईल.

संशयित आयएमईआयच्या यादीत असलेल्यांना ३० दिवसांच्या कालावधीत कोणत्याही कॉल, इंटरनेट आणि एसएमएसला परवानगी नसेल.

याशिवाय संशियित आयएमईआयच्या यादीत असलेल्या असलेल्या उपकरणांचा उपयोग करण्यासाठी कनेक्शनवरून सातत्यानं कॉल करणाऱ्या कॉलरना कॉल, एसएमएस आणि डेटासाठी रिव्हेरिफिकेशन करण्यास सांगितलं जाईल.

जर रिव्हेरिफिकेशननंतर कॉलरचा नंबर पुन्हा सक्रियझाला आणि त्यानंतर त्यानं नियमांचं उल्लंघन केलं तर प्रति २० दिवस २० कॉल्सपर्यंत त्याचा क्रमांक मर्यादित केला जाईल.

यानंतरही त्यानं नियमांचं उल्लंघन केल्यास दूरसंचार कनेक्शन घेण्यासाठी वापरण्यात आलेल्या ओळखपत्रावर आणि पत्त्यावर दोन वर्षांसाठी बंदी घातली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

यासाठी डीओटीची डिजिटल इंटेलिजन्स युनिट कॉल उल्लंघनाचा तपास करणार आहे. तसंच काही बाबी आढळल्यास नंबरच्या रिव्हेरिफिकेशनसाठी एक सिस्टम जनरेटेड मेसेज पाठवला जाईल.

रिव्हेरिफिकेशनच्या स्थितीत मोबाईल क्रमांक बंद केला जाईल. तसंच संबंधित मोबाईलचा आयईएमआय क्रमांक ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात येईल.

दरम्यान, ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आलेल्या क्रमांकावर ३० दिवसांपर्यंत मेसेज आणि कॉल करण्याची सुविधा देण्यात येणार नाही..

ग्रे लिस्टमध्ये आयएमईआय क्रमांक आल्यानंतर पुन्हा एकदा रिव्हेरिफिकेशन करावं लागेल. त्यानंतरही नियमांचं उल्लंघन झाल्यास मेसेजेसची संख्या कमी करण्यात येईल.

अशा परिस्थितीत ग्राहकांना महिन्याल जास्तीतजास्त २० मेसेजेस पाठवता येतील. तसंच यानंतर नियमांचं उल्लंघन केल्यास क्रमांक दोन वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येईल अशा तरतुदी यात करण्यात आल्या आहेत.