दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ? डीएमध्ये मोठी वाढ होऊ शकते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 01:24 PM2023-10-12T13:24:48+5:302023-10-12T13:32:18+5:30

केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे देशातील सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. यामध्ये ४७.५८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९.७६ लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे.

या वर्षी दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते. त्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात भेट देऊ शकते.

याआधी दसऱ्यापर्यंत याची घोषणा होणे अपेक्षित होते, पण आता वृत्तांद्वारे प्राप्त होत असलेल्या अपडेट्सनुसार, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीत मोठी भेट देऊ शकते.

नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला तर तो सध्याच्या ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होईल. महागाई भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे. मात्र, अद्याप कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीबाबत सरकारकडून कोणतेही वक्तव्य किंवा प्रतिक्रिया आलेली नाही.

सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा करते. ज्याचा लाभ त्यांना १ जानेवारी व १ जुलैपासून दिला जातो. २०२३ साठी, सरकारने पहिली दुरुस्ती करून २४ मार्च २०२३ रोजी डीए वाढीची घोषणा केली होती आणि त्यानंतर १ जानेवारी २०२३ पासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळत आहे.

त्यानंतर केंद्राने कर्मचाऱ्यांना दिला जाणारा ३८ टक्के डीए ४ टक्क्यांनी वाढवून ४२ टक्के केला होता. आता सरकारने दिवाळीच्या दिवशी महागाई भत्ता वाढवला तर त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२३ पासून मिळणार आहे.

सरकारी कर्मचारी ४ टक्क्यांच्या डीए वाढीची मागणी करत आहेत. कर्मचार्‍यांच्या पगाराचा डीए हा महत्त्वाचा भाग असून त्यात वाढ झाल्याचा थेट परिणाम कर्मचार्‍यांना मिळणाऱ्या पगारावर होतो.

महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित आहे. यासाठी CPI-IW डेटा मानक मानला जातो. जुलै 2023 मध्ये, CPI-IW ३.३ अंकांनी वाढून १३९.७ वर पोहोचला होता. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास ती सुमारे ०.९० टक्के अधिक होती.

यापूर्वी जून २०२३ मध्ये ते १३६.४ होते आणि मे महिन्यात ते १३४.७ होते. ऑगस्टमध्ये ०.५ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे आणि ती १३९.२ टक्क्यांवर आली आहे. अजूनही मे-जून महिन्याच्या तुलनेत खूपच जास्त आहे. अशा परिस्थितीत सरकार ४ ऐवजी ३ टक्के वाढ देऊ शकते, म्हणजेच महागाई भत्ता ४२ वरून ४५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवला तर १८,००० रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता ७,५६० रुपयांवरून ८,१०० रुपयांपर्यंत वाढेल. म्हणजेच त्यांच्या पगारात थेट ५४० रुपयांची वाढ होणार आहे. ४ टक्के वाढीच्या आधारे बघितले तर महागाई भत्ता ८,२८० रुपये आणि पगार ६९० रुपयांनी वाढेल.