सरकारच्या 'या' योजनेत तुमच्या मुलीसाठी जमा करू शकता ६४ लाखांचा फंड, आजच सुरू करा खातं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 09:23 AM2023-08-10T09:23:11+5:302023-08-10T09:32:27+5:30

तुम्ही मुलीच्या जन्मानंतरच लगेचच यात गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही तिच्यासाठी मोठा फंड जमा करू शकता.

Sukanya Samriddhi Yojana : जर तुमच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी तुम्हाला एकरकमी ६४ लाख रुपये मिळाले तर? तुम्हाला नक्कीच अधिक आनंद होईल. आजकाल मुलांच्या शिक्षणात आणि लग्नकार्यात खूप खर्च होतो. अनेकदा पैशांअभावी मुलांच्या उच्चशिक्षणासाठीही अडचणी येतात.

याचा उत्तम मार्ग म्हणजे मुलांचा जन्म होताच त्यांच्यासाठी पैशांची बचत करायला सुरू करणं. जर मुलींबद्दल सांगायचं झालं तर सरकारनं मुलींच्या भविष्याचा विचार करून चांगली योजना आणलीये. सुकन्या समृद्धी असं या योजनेचं नाव आहे. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलीचं खाते उघडू शकता. येथे तुम्ही छोटी गुंतवणूक करून मोठा फंड तयार करू शकता.

तुमच्या मुलीचा जन्म होताच तुम्ही तिचं सुकन्या समृद्धी खातं (SSY Account) उघडल्यास अतिशय उत्तम. तुमच्या मुलीचे वय १० वर्षे पूर्ण होईपर्यंत तुम्ही या योजनेत तिचे खाते उघडू शकता. जर एखाद्या गुंतवणूकदारानं आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच या योजनेत खाते उघडले तर तो १५ वर्षांसाठी या योजनेत आपले योगदान जमा करू शकतो.

ही एक छोटी बचत योजना आहे. सरकार दर तीन महिन्यांनी या योजनांसाठी व्याजदर निश्चित करते. जुलै ते सप्टेंबर २०२३ या तिमाहीसाठी, सरकारनं सुकन्या समृद्धी योजनेच्या (SSY Interest Rates) व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.

यावेळी तुम्हाला या योजनेवर वार्षिक ८ टक्के दराने व्याज मिळेल. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी रकमेच्या ५० टक्के रक्कम काढता येते. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर उर्वरित रक्कम काढता येईल.

सुकन्या समृद्धी योजनेत, एका वर्षात १.५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर सवलतीचा लाभ देखील उपलब्ध आहे. या योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त १.५० लाख रुपये जमा करता येतात.

सुकन्या समृद्धी योजना EEE दर्जासह येते. म्हणजेच तीन ठिकाणी करसवलत मिळते. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवलेल्या रकमेवर कर सवलत उपलब्ध आहे. या योजनेतून मिळणारे व्याजही करमुक्त आहे. याशिवाय या योजनेत मॅच्युरिटी रक्कमही करमुक्त आहे.

जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा १२,५०० रुपये जमा केले, तर ही रक्कम एका वर्षात १.५ लाख रुपये होईल. या रकमेवर कोणताही कर लागणार नाही. जर आपण मॅच्युरिटीवर ७.६% व्याजदर पकडला तर तो गुंतवणूकदार आपल्या मुलीसाठी मॅच्युरिटी होईपर्यंत मोठा फंड तयार करेल.

जर गुंतवणूकदाराने त्याची मुलगी २१ वर्षांची झाल्यावर संपूर्ण रक्कम काढली, तर मॅच्युरिटी रक्कम ६३ लाख ७९ हजार ६३४ रुपये होईल. यामध्ये गुंतवलेली रक्कम २२,५०,००० रुपये असेल. तर व्याजाचे उत्पन्न ४१,२९,६३४ रुपये असेल. अशा प्रकारे, तुम्ही सुकन्या समृद्धी खात्यात दरमहा १२,५०० रुपये जमा केल्यास, तुम्ही ६४ लाख रुपयांचा निधी तयार करू शकता.