Nitin Gadkari on Capital Market: सरकारच्या 'या' प्लॅननं हमखास वाढणार आपलं उत्पन्न! नितिन गडकरींच्या घोषणेनं सर्वच आश्चर्यचकित By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 10:55 AM 2022-07-13T10:55:58+5:30 2022-07-13T11:08:21+5:30
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आता लवकरच, आपण देशातील ज्या रस्त्यांवरून प्रवास कराल, त्या रस्त्यांपासून आपल्याला पैसा कमावण्याचीही संधी मिळणार आहे. हो, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
नितिन गडकरी यांनी मंगळवारी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात ही घोषणा केली आहे. सरकार लवकरच रस्ते बांधनीशी संबंधित प्रोजेक्ट्ससाठी कॅपिटल मार्केटमधून पैसा उभा करणार आहे. अर्थात, आता देशातील रस्ते परदेशी पैशांतून नाही, तर आपल्याच पैशांतून तयार तोतील आणि यातून आपल्याला पैसे कमावण्याचीही संधी मिळेल.
इनव्हेस्टमेंटवर मिळणार 8 टक्के गॅरंटेड रिटर्न - गडकरी म्हणाले, सरकार लवकरच स्मॉल स्केल इन्व्हेस्टर्स प्लॅन आणण्याच्या तयारीत आहे. यात सर्वसामान्य माणसांना एक ते दोन लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे. या गुंतवणुकीवर त्याला 8 टक्के एवढा गॅरंटेड परतावा दिला जाईल.
गडकरी म्हणाले, जगभरात मंदीची शक्यता वर्तवली जात असली तरी, पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी पैसा उभा करण्यात कसल्याही प्रकारची अडचण नाही. 'आता मी भांडवली बाजाराकडे वळणार आहे. मला आर्थिक संसाधने उभारण्यात कसल्याही प्रकारची समस्या नाही. याच बरोबर, अशाप्रकारे बाजारातून रस्ते प्रकल्पांसाठी मोठी रक्कम उपलब्ध होईल, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.
...अर्थमंत्रालय याकडे लक्ष देईल - कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (NHAI) भांडवली खर्चाच्या निधीसाठी धोकादायक ठरतील? असे विचारले असता, गडकरी म्हणाले, यावर अर्थमंत्रालय विचार करेल. खरे तर, तेलाच्या किंमती वाढल्याने सेस कमी होण्याची शक्यता निर्माण होते.
क्रूडच्या किमतीत वाढ झाल्याने समस्या - एनएचएआयच्या बजेट वाटपाचा मोठा भाग, हा रस्ते आणि पायाभूत सुविधा निधीतूनच येतो. तो डिझेल आणि पेट्रोलवर लावल्या जाणाऱ्या सेसच्या माध्यमाने तयार होतो. गडकरी म्हणाले, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तब्बल 50,000 कोटी रुपयांच्या बांधकाम उपकरण क्षेत्राला अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, 'डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आपल्यालाही आर्थिक व्यवहार्यतेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे, असेही गडकरी म्हणाले.