Air India नंतर चार सब्सिडायरी कंपन्यांनी विक्री करणार सरकार, हा आहे संपूर्ण प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 05:23 PM2022-09-12T17:23:42+5:302022-09-12T17:39:24+5:30

एअर इंडिया या विमान कंपनीनंतर आता केंद्र सरकार आपली उपकंपन्यांचीही विक्री करण्याची तयारी करत आहे.

एअर इंडिया या विमान कंपनीनंतर आता केंद्र सरकार आपली उपकंपन्यांचीही विक्री करण्याची तयारी करत आहे. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL), एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड (AASL) किंवा अलायन्स एअर, एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) आणि हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (HCI) या चार कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये सरकारचा हिस्सा आहे.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, प्रस्तावित विक्री प्रक्रियेवर काम सुरू झाले आहे. बर्ड ग्रुप, सेलेबी एव्हिएशन आणि आय स्क्वेअर कॅपिटल हे संभाव्य बिडर्स आहेत. बर्ड ग्रुप, सेलेबी एव्हिएशन आणि आय स्क्वेअर कॅपिटलने एआयएटीएसएल घेण्यास स्वारस्य दाखवल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

बर्ड ग्रुप ही दिल्लीतील सर्वात मोठी थर्ड पार्टी राउंड हँडलिंग कंपन्यांपैकी एक आहे. त्याच वेळी, सेलेबी एव्हिएशन होल्डिंग ही तुर्कीमधील ग्राउंड हँडलिंग कंपनी आहे आणि आय स्क्वेअर कॅपिटल ही खाजगी इक्विटी फर्म आहे. केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे हस्तांतरित केली होती.

दरम्यान, कंपनी आपल्या ताफ्याचा विस्तार करणार असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. कंपनी 30 नवीन विमाने आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार असून त्यात पाच वाइड-बॉडी बोईंग विमानांचा समावेश असल्याचे एअर इंडियाने सांगितले.

समोर आलेल्या माहितीनुसार, एअरलाइनने पुढील 15 महिन्यांत पाच वाइड-बॉडी बोईंग विमाने आणि 25 थिन-बॉडी एअरबस विमाने समाविष्ट करण्यासाठी लीज आणि लेटर ऑफ इंटेंटवर स्वाक्षरी केली आहे. भाड्याने घेतलेल्या विमानात 21 एअरबस A320 Neos, चार एअरबस A321 Neos आणि पाच बोईंग B777-200LR चा समावेश आहे.