आता हेल्थ क्लेम इन्शुरन्ससाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही, सरकारचा नवीन उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 02:06 PM2024-07-12T14:06:55+5:302024-07-12T14:19:49+5:30

Health Claim Insurance : नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत, मंत्रालयाने एक नवीन आरोग्य डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील आरोग्य विमा इकोसिस्टममध्ये सकारात्मक बदलांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म तयार केले आहे. नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत, मंत्रालयाने एक नवीन आरोग्य डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे.

या प्लॅटफॉर्मवर देशातील मोठी आणि छोटी रुग्णालये, विमा कंपन्या जोडल्या जातील आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे हेल्थ क्लेम लवकरच निकाली काढता येतील. केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले की, आतापर्यंत ५२ हून अधिक आरोग्य विमा कंपन्यांशी चर्चा झाली आहे.

जवळपास सर्व महत्त्वाच्या आरोग्य विमा कंपन्या या प्लॅटफॉर्मवर सामील होण्यास तयार आहेत. ज्या विमा कंपन्यांनी सरकारच्या या नव्या योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना संपूर्ण प्रक्रियेची माहिती देण्यात आली असून लवकरच नॅशनल क्लेम हेल्थ पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.

देशातील आरोग्य विमा इकोसिस्टम सामान्य लोकांसाठी सुलभ व्हावी. या इकोसिस्टममध्ये पारदर्शकता असावी. तसेच, एकच पोर्टल असावे, जिथे रुग्णालये रुग्णांचे क्लेम पुढे पाठवतील आणि त्याच पोर्टलवरून विमा कंपन्या क्लेमची माहिती घेऊन मंजुरी देतील.

यामुळे रुग्णालयाला प्रत्येक रुग्णासाठी प्रत्येक विमा कंपनीच्या पोर्टलला भेट देण्याची गरज भासणार नाही आणि कंपन्यांना एकाच पोर्टलवर सर्व माहिती मिळू शकेल, असा आरोग्य मंत्रालयाचा प्रयत्न आहे. या उपक्रमाद्वारे २५० ते ३०० मोठी रुग्णालये जोडली जातील, असे म्हटले जात आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही रुग्णालयाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. सध्या रुग्णालयांना ५० हून अधिक विमा कंपन्यांकडून त्यांच्या पोर्टलवर क्लेम तयार करून त्यावर प्रक्रिया करावी लागते. दरम्यान, रुग्णाचे वेगवेगळ्या कंपन्यांकडे क्लेम असतात, तेव्हा प्रत्येक कंपनीला माहिती पाठवावी लागते.

तसेच, रुग्णालयातील विमा काउंटरवर मोठी गर्दी होत असून रुग्णांच्या नातेवाइकांना अनेक तास ताटकळत राहावे लागते. हे पोर्टल सुरू झाल्यानंतर क्लेमची प्रक्रिया एकाच प्लॅटफॉर्मद्वारे केली जाईल. रुग्णालये आणि विमा कंपन्या एकाच प्लॅटफॉर्मवर तपासतील आणि यामुळे प्रक्रियेला गती मिळेल.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) देखील या उपक्रमाचे स्वागत केले आहे. आयुष मंत्रालयही असाच एक पुढाकार घेण्याच्या तयारीत आहे. सामान्य विमा कंपन्या आणि आयुष रुग्णालयांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

देशातील अनेक मोठ्या खाजगी रुग्णालयांमध्ये लोकांसाठी आयुष उपचार सुविधा सुरू करण्यात आली आहे, परंतु सध्या रुग्णांना आरोग्य विम्याचा लाभ मिळत नाही. विमा कंपन्याही आयुष उपचारात सहभागी झाल्यास रुग्णांनाही फायदा होईल.