संकटात ज्यानं दिली साथ, त्याला अदानींनी केलं मालामाल; ७५ दिवसांत कमावले १० हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 10:19 AM2023-05-24T10:19:05+5:302023-05-24T16:41:50+5:30

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी(Gautam Adani) यांच्या नेतृत्वात अदानी ग्रुप पुन्हा भरारी घेत आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानीवर संकट कोसळलं होते. शेअर बाजारात अदानींचे शेअर्स कोसळले होते. काही सेकंदात अदानींनी कोट्यवधीची संपत्ती गमावली होती.

अदानी ग्रुपवर आलेल्या संकटामुळे गुंतवणुकदारही अडचणीत आले. शेअर्सचे दर पडल्याने गुंतवणुकदारांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. परंतु त्याच संकटात अदानींच्या मदतीला एक आशेचा हात आला तो म्हणजे जीक्यूजीचे राजीव जैन यांचा.

गेल्या काही दिवसांत अदानी ग्रुपच्या शेअर्सचे पुन्हा भरारी घेतली आहे. त्यात जीक्यूजीचे राजीव जैन यांनीही अदानी समुहात १० टक्के भागीदारी वाढवली आहे. यूएस बेस्ड इन्वेस्टमेंट फर्म ग्रुपने भविष्यातील योजनांमध्ये भागीदारी घेतली आहे. अदानी ग्रुप भारतातील बेस्ट इन्फ्रास्ट्रचर एसेट आहे असं राजीव जैन म्हणाले.

जीक्यूजीचे मुख्य अधिकारी राजीव जैन म्हणाले की, ५ वर्षांत आम्हाला व्हॅल्युएशनच्या आधारे अदानी कुटुंबानंतर अदानी ग्रुपमधील सर्वात मोठे गुंतवणूकदार बनायचंय. आम्ही अदानी यांच्या कुठल्याही भविष्यातील योजनांमध्ये भागीदारी घेऊ शकतो.

अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये जीक्यूजी पार्टनर्सची व्हॅल्यू जवळपास ३.५ अब्ज डॉलर होती. मार्च महिन्यात जीक्यूजीने अदानी ग्रुपच्या ४ कंपन्यांमध्ये तब्बल १५, ४४६ कोटींची गुंतवणूक केली. आता ही गुंतवणूक रक्कम १०,०६९ कोटींनी वाढून २५,५१६ कोटी इतकी झाली आहे.

मागील काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अदानी समूहातील सर्वच कंपन्यांचे शेअर रॉकेट स्पीडने वाढतायेत. अनेक कंपन्यांच्या शेअर्सना अप्पर सर्किट लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेअर्सचे दर वाढले.

हिंडेनबर्गच्या संकटातून बाहेर निघालेले गौतम अदानी यांनी जोरदार कमबॅक केले आहे. जगातील टॉप अब्जाधीशांच्या यादीत अदानी पुन्हा एकदा टॉप २० मध्ये आले आहेत. मागील ३ दिवसांत अदानींची संपत्ती ६४.२ अब्ज डॉलरपर्यंत पोहचली आहे.

अदानी ग्रुप कंपन्यांचे शेअर्सचे दर सध्या बाजारात वाढत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. अदानी यांच्या कंपनीत गुंतवणूक केलेल्यांना मोठा आर्थिक फायदा होत असल्याचे २ दिवसांपासून दिसत आहे.

अलीकडेच सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या पॅनेलने हिंडेनबर्गच्या रिपोर्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अदानी समुहावर लावलेल्या आरोपात काहीही तथ्य दिसत नाही असं म्हटलं. १७३ पानांचा हा रिपोर्ट सुप्रीम कोर्टात सादर केला आहे.

या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, समितीला अदानी समुहाच्या शेअरमध्ये कुठलीही दिशाभूल केली नसल्याचे पुरावे मिळाले नाहीत. अदानी समूहास मिळालेल्या विदेशी संस्थांच्या निधीचा सेबीचा तपास कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचलेला नाही, असेही समितीने नमूद केले आहे.