पॉपकॉर्नच्या 'जीएसटी'मुळे वाढणार किंमती; आता किती द्यावे लागणार पैसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 18:58 IST2024-12-21T18:52:22+5:302024-12-21T18:58:50+5:30

GST on Popcorn: जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्नवर तीन प्रकारे जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राजस्थानातील जैसलमेर येथे सुरू असलेल्या जीएसटी परिषदेच्या ५५व्या बैठकीत पॉपकॉर्नवरील जीएसटी कर आकारणीबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वेगवेगळ्या पॉपकॉर्नवर तीन प्रकारे जीएसटी आकारण्याचा निर्णय झाला.

वेगवेगळ्या स्वरूपात आणि प्रकारामध्ये पॉपकॉर्न विकले जाते. या त्या श्रेणीनुसार त्यावर जीएसटी आकारण्याचा निर्णय झाला आहे. पॉपकॉर्न कशा प्रकारे विकले जात आहे, म्हणजे खुले की पॅकिंग करून यावरही ते स्वस्त महाग ठरणार आहे.

पॉपकॉर्नमध्ये मीठ आणि मसाला असेल आणि ते पॅक केलेले असेल, पण लेबल न लावता विकले जात असेल, तर त्यावर ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. हेच पॉपकॉर्न लेबलसह विकले जात असेल, तर त्यावर १२ टक्के जीएसटी लागणार आहे.

कॅरेमल पॉपकॉर्नमध्ये साखर मिसळली जाते. त्यामुळे त्याला साखरेची मिठाई या प्रकारात हे गणले जाणार असून, त्यावर १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. म्हणजेच जर तुम्ही शंभर रुपयाचे पॉपकॉर्न खरेदी केले असेल, तर ते कोणत्या प्रकारचे आहे, त्यावर जीएसटी ठरणार आहे. हेच उदाहरणासह समजून घ्या.

समजा तुम्ही १०० रुपयाचे मीठ आणि मसाला असलेले विना लेबलचे पॉपकॉर्न घेतले, तर त्यावर ५ टक्के जीएसटी म्हणजे १०५ रुपये द्यावे लागणार आहे. पण, हेच पॉपकॉर्न लेबलसह असेल तर तुम्हाला १२ टक्के जीएसटी म्हणजे ११२ रुपये द्यावे लागतील.

आता कॅरेमल पॉपकॉर्न म्हणजे गोड असलेले पॉपकॉर्न तुम्ही १०० रुपयांना घेतले, तर त्यावर १८ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. म्हणजे ११८ रुपयांत तुम्हाला कॅरेमल पॉपकॉर्न मिळणार आहे.

जीएसटी परिषदेने घेतलेल्या या निर्णयासंदर्भातील सविस्तर निवेदन केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ प्रसिद्ध करणार आहे.